ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, मुख्य आरोपी टल्लीला ठोकल्या बेड्या, हेल्मेटधारी पण ताब्यात
ठाण्यातील मानपाडा भागात २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघांना अटक झाली आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप ( बाळू ) पूर्णेकर यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. तसेच दुसरा साथीदार हेल्मेटधारी आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी पप्या शिंदे या आरोपीला सुरुवातीला अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून त्याचे साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार अशा आरोपींची ओळख पटली होती. दरम्यान, ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
यावेळी माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष मनोज प्रधान उपस्थित होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.
ठाण्यात पीएसआय किसन भोईर मृत्युमुखी पडले, त्यावेळी पोलीस यंत्रणा सक्षम झाली नाही. दाढीवाले पालकमंत्री आले आहेत, त्यांना अजून वेळ मिळाला नाही. भाजपचे आमदार, खासदार बाजूच्या जिल्ह्यातील लोक आले, पण पालकमंत्री आले नाहीत हे दुर्दैवी आहे अशी टीका शिवसेना नेते राजन विचारे यांनी म्हटले आहे. आम्ही पोलिसांना सांगितले की दबावाने या केसचा तपास करु नका, मी पोलिसांना दोष देत नाही, सर्व अधिकारी चांगले आहेत, त्यांनी तपास व्यवस्थित केला पाहिजे बाळू उर्फ प्रदीप पुर्णेकर यांचे शव पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागले हे दुर्दैवी आहे असेही राजन विचारे यावेळी म्हणाले.
शोकसभा असताना,ऑफिसची पाहिणी केली. रेकी केली गेली. आज जनता रस्त्यावर आली आहे , ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आजपर्यंत अनेक मोर्चे झाले पोलीस प्रशासन विरोधात हा ठाण्यातील पहिला मोर्चा आहे. बाळूची हत्या झाली, पालकमंत्री पक्षप्रवेश घेत होते, पुरस्कार चालू होते. अनेक मर्डर आणि हाफ मर्डर झाले गंभीर आहे , पुर्णेकर कुटुंबांना कमी समजू नका. तुम्ही त्यांना गफलतीमध्ये मारले, भाड्याच्या लोकांनी मारले. तुम्ही चोरलेल्या पक्षाचे नेतृत्व करतात,आम्ही कोणाला घाबरत नाही, आंडू पांडू कोणत्या भाईला घाबरत नाही, माझ्या मागे राज ठाकरे आहेत ते बघतील काय करायचे असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. यापुढे तुमच्या वतीने ठाण्यातील धंदे बंद झाले नाही तर आम्ही विरोधक म्हणून उतरु. राजन विचारे यांच्या नेतृत्वात आम्ही आहोत, ही आंदोलनाची सुरुवात आहे. आमचे आंदोलन बाळूला न्याय मिळाल्याशिवाय संपणार नाही. ठाणे भयमुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असेही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
