प्रियकराला परत मिळवण्याचा खटाटोप अंगलट आला, अल्पवयीन मुलीची फेक अॅपद्वारे फसवणूक

| Updated on: Jan 23, 2023 | 11:28 PM

अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले होते. यामुळे प्रियकराला परत मिळवण्यासाठी तिने ‘हाउ टू ब्रिंग बॅक एक्स’ हे अॅप डाऊनलोड केले. या अॅपमध्ये स्वतःची संपूर्ण माहिती भरली.

प्रियकराला परत मिळवण्याचा खटाटोप अंगलट आला, अल्पवयीन मुलीची फेक अॅपद्वारे फसवणूक
ऑनलाईन अॅपद्वारे अल्पवयीन मुलीची फसवणूक
Image Credit source: Social Media
Follow us on

चेन्नई : प्रेम करणारे आंधळे असतात, असे म्हटले जाते. त्याची प्रचिती वेळोवेळी येत आहे. तामिळनाडू येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्या आधीच्या प्रियकराला भेटण्यासाठी ऑनलाइन प्रयत्न केला. यासाठी तिने एका ॲपच्या माध्यमातून खटाटोप चालवला होता. तिचा हा खटाटोप चांगलाच महागात पडला. प्रियकराला आपल्याकडे परत आणण्यासाठी दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीकडून 40 तोळे सोने लुबाडले. फसवणूक झाल्याचे उघड होताच मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर चेन्नई एअरपोर्ट पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले होते. यामुळे प्रियकराला परत मिळवण्यासाठी तिने ‘हाउ टू ब्रिंग बॅक एक्स’ हे अॅप डाऊनलोड केले. या अॅपमध्ये स्वतःची संपूर्ण माहिती भरली.

अॅपमधील माहिती वाचून आरोपींनी मुलीशी संपर्क साधत तिला चेन्नई विमानतळावर भेटायला बोलावले. तक्रारदार मुलगी तेथे पोहोचताच आरोपींनी बतावणी करून तिच्याकडे दागिने किंवा रोख रक्कम मागितली. अल्पवयीन मुलीने आपला प्रियकर भेटणार असल्याच्या वेड्या आशेने आरोपींची मागणी पूर्ण केली आणि त्यांच्याकडे दागिने सुपूर्द केले.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांनंतर मागितली पाच लाखांची खंडणी

आरोपींनी अल्पवयीन मुलीची ऑनलाइन फसवणूक केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या मुलीशी संपर्क केला आणि पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली. जर पाच लाख रुपये दिले नाहीत तर तुझ्याबद्दल सोशल मीडियामध्ये बदनामीकारक माहिती व्हायरल करू अशी धमकी आरोपींनी मुलीला दिली होती.

या धमकीनंतर हादरलेल्या मुलीने आपल्या आईकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार फारच भयानक असून मुलच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने मुलीच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मुलीच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत चेन्नई विमानतळावरील पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम वेबसाईटच्या कार्यालयाचा थांगपत्ता लावला.

यावेळी मुलीची फसवणूक ज्या वेबसाईटच्या माध्यामातून करण्यात आली, ती वेबसाईट पंजाब येथून चालवली जात असल्याचे उघडकीस आले. त्यादिशेने पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांनी सापळा रचून केली अटक

अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या पंजाब येथील दोन आरोपींना चेन्नई विमानतळावर सापळा रचून अटक करण्यात आली. फसवणूक झालेल्या अल्पवयीन मुलीला आरोपींसोबत फोन कॉलवरून संपर्कात ठेवण्यात आले.

चेन्नई विमानतळावर याआधी ज्या ठिकाणी पैसे दिले होते, त्याच ठिकाणी भेटण्यासाठी या, असा मेसेज मुलीने आरोपींना दिला. त्यानुसार आरोपींनी 21 जानेवारीला पंजाब येथून चेन्नईसाठी विमानातून उड्डाण घेतले.

या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी विमान प्रवासी असल्याचा दिखावा केला. यादरम्यान आरोपी गाफील असल्याचे पाहून तसेच ते मुलीकडून पैसे घेण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना घेरले. यावेळी दोघांच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या.