घरचे अन्न खाल्ल्यानंतर विषबाधा, शेतकरी कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

घरचे अन्न खाल्ल्यानंतर विषबाधा, शेतकरी कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
नगरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 10, 2023 | 5:12 PM

अहमदनगर / कुणाल जयकर : घरचे अन्न खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमधील टाकळी काझी गावात घडली आहे. एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवराज बापू म्हस्के, स्वराज बापू म्हस्के अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सार्थक भाउसाहेब म्हस्के या 14 वर्षाच्या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरी करुन ठेवलेल्या संत्र्याचा ज्युस किंवा मांसाहारी पदार्थातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तपासाअंती सत्य उघड होईल. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ज्यूस आणि मटण खाल्ल्यानंतर मुलांची तब्येत बिघडली

टाकळी येथे राहणाऱ्या म्हस्के कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. बापू म्हस्के आणि भाऊसाहेब म्हस्के हे दोघे भाऊ राहतात. यापैकी बापू हे गवंडी आहेत, तर भाऊसाहेब हे चालक आहेत. बापू यांना शिवराज आणि स्वराज ही दोन मुलं होती, तर भाऊसाहेब यांना सार्थक हा मुलगा होता. मंगळवारी मुलांनी घरी मटण खाल्ले होते, तर बुधवारी फ्रिजमध्ये बनवून ठेवलेला ज्यूस प्यायले. यानंतर गुरुवारी सकाळी मुलांना त्रास होऊ लागला.

दोघांचा मृत्यू, एकावर उपचार सुरु

मुलांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच वाटेत दीड वर्षाच्या सार्थकचा मृत्यू झाला. यानंतर साडेचार वर्षाच्या शिवराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 14 वर्षाच्या सार्थकवर उपचार सुरु आहेत, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. बापू यांच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलांना विषबाधा नेमकी ज्यूसमुळे झाली की मटणातून झाली याबाबत तपास सुरु आहे.