कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते, तरुण घरी एकटाच होता, दुसऱ्या दिवशी मामा घरी आला तर…

संपूर्ण कुटुंबीय लग्न सोहळ्यासाठी दुसऱ्या गावात गेले होते. घरी 25 वर्षाचा तरुण एकटाच होता. तरुण रात्री घरी आला, जेवला आणि झोपला. सकाळ होताच भलंतच समोर आलं.

कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते, तरुण घरी एकटाच होता, दुसऱ्या दिवशी मामा घरी आला तर...
तीन महिन्यापुर्वी दुसरं लग्न
Image Credit source: Google
| Updated on: May 08, 2023 | 10:12 PM

सागर : बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यात हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या हव्यासातून मामाने सावत्र भाच्याचा काटा काढल्याची घटना घडली. हत्या केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी मामाने बनाव रचला पण अखेर अडकलाच. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. समरजित सिंग असे मयत 25 वर्षीय भाच्याचे नाव आहे. समरजितच्या मृत्यूमुळे आरोपीचा सख्खा भाचा संपत्तीचा एकुलता एक वारस बनेल, म्हणून आरोपीने सावत्र भाच्याचा काटा काढला. रज्जू सिंग असे आरोपी मामाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

घरी कुणी नसल्याची संधी साधत मामाने भाच्याला संपवले

सागर जिल्ह्यातील बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकल मऊ गावात ही घटना घडली. मोकल मऊ गावात तीन दिवसांपूर्वी समरजित सिंग याचा रक्ताने माखलेला मृतदेह घराजवळ आढळून आला होता. तरुणाचे वडील आणि कुटुंबीय एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. यामुळे समरजित घरी एकटा होता. ही संधी साधून आरोपी मामाने सावत्र भाच्याला संपवला. प्रकरण उघड होताच सर्वांनाच धक्का बसला.

हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी समरजीत मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने मामाच्या कानशीलात लगावली. यानंतर आरोपी रज्जू सिंग याने त्याची समजूत काढून त्याला झोपवले आणि तो आपल्या घरी निघून गेला. मात्र भाच्याने मारलेली चापट आणि आपल्या सख्ख्या भाच्याला मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी रज्जू रात्री पुन्हा समरजीतच्या घरी आला. यानंतर त्याने त्याची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकला. तसेच स्वतःचे रक्ताने माखलेले कपडेही लपवून ठेवले आणि घरी जाऊन झोपी गेला.

आरोपीची तुरुंगात रवानगी

सकाळी उठून पुन्हा भाच्याच्या घरी आला आणि त्याच्या हत्येचा कांगवा केला. मात्र पोलीस तपासाता त्याचा कांगावा उघड झाला. त्याच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची तुरुंगात रवानगी झाली आहे. समरजीतचे वडील जाहर सिंह यांनी दोन लग्न केली. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दोन मुली होत्या, मुली विवाहित आहेत. दुसरीकडे जाहर सिंगने आरोपी रज्जूच्या बहिणीशी दुसरे लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.