
खऱ्याखुऱ्या महिला न्यायाधीशाला प्रेमात फसवल्याच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिला जजची इन्स्टाग्रामवर महाराष्ट्राच्या एका युवकासोबत मैत्री झाली. युवकाने तिला स्वत: न्यायाधीश असल्याच सांगितलं. दोघांमध्ये घनिष्ट मैत्री होत गेली. त्यानंतर भेटण्याचा सिलसिला सुरु झाला. या दरम्यान महिला न्यायाधीशाला त्या युवकाच सत्य समजलं. तिने त्या युवकासोबत मैत्री मोडली. पण युवकाला हे सहन झालं नाही. त्याने महिला जजला धमकवायला सुरुवात केली. सोबतच त्याने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे.
महिला जजच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. महिला न्यायाधीशाच्या आईने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हिमांशु नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. आरोपीने तो सिविल जज असल्याच लिहिलं होतं. 14 डिसेंबरला त्याने सांगितलं की, तो हैदराबादमधला मोठा बिझनेसमन आहे. त्याने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
मुलीला कुठे यायला सांगितलं?
मुलीने त्याला बायोडाटा पाठवायला सांगितला. त्याने बायोडाटा WhatsApp वर पाठवला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मुलीला हैदराबाद आणि मुंबईला यायला सांगितलं. आरोपीने आपल्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्र आणि व्हिडिओ पाठवले. 21 डिसेंबर 2024 रोजी त्याने बायोडाटा पाठवला. त्यावर हिमालय मारुती देवकते असं नाव लिहिलं होतं.
मुलीचा फोटो काढला
महिला जजच्या आईनुसार, हिमांशु आणि हिमालय दोन्ही आपलीच नाव असल्याच त्याने सांगितलं होतं. 27 डिसेंबरला त्याची पत्रिका मागितली. 28 डिसेंबरला मुलीला व्हिडिओ कॉल करुन बोलला की, तो मेरठला येतोय. 29 डिसेंबरला रात्री 8.30 वाजता मुलीला कॉल करुन सांगितलं की, तो मेरठला आलाय. मुलगी त्याला भेटायला गेली, त्यावेळी आई-वडिल सोबत नव्हते. म्हणून मुलगी त्याला कॅफेमध्ये भेटली. तिथे त्याने आई-वडिलांना फोटो पाठवायचा आहे, म्हणून मुलीचा फोटो काढला. 30 डिसेंबरला हिमांशुने आई-वडिल येणार आहेत सांगून मुलीला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावलं.
भेटण्यासाठी दिल्लीला गेली
कुटुंबियांची परवानगी घेऊन मुलगी त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला गेली. कनॉट प्लेसला ती पोहोचली, तिथे फक्त हिमांशु होता. बराच वेळ वाट पाहिली. पण त्याचे आई-वडिल आले नाहीत. तेव्हा तो मुलीला गाडीत बसवून यूपी सदन येथे सोडण्यासाठी आला. यूपी सदनात आल्यानंतर मुलीने लग्नाला नकार दिला. त्यावेळी आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केलं.
आली नाहीस, तर उचलून नेईन अशी धमकी
त्यानंतर मुलगी घरी निघून आली. 31 डिसेंबरला रात्री साडेआठ वाजता हिमांशु तिच्या घरी गेला. मुलीने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं, तेव्हा त्याने धमकावलं. त्याचे राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची धमकी दिली. सोबत महाराष्ट्रात आली नाहीस, तर उचलून नेईन अशी धमकी दिली. बराच गदारोळ झाल्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. पोलिसांकडून तपास सुरु असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.