Vaishnavi Hagavane Death Case : अंजली दमानियांचा वकिल विपुल दुशीवर जोरदार हल्लाबोल
"आम्ही वैष्णवी हगवणे यांचे चारित्र्यहनन केलेलं नाही. वैष्णवी एका वेगळ्या व्यक्तीशी चॅट करत होती. त्या व्यक्तीचे आणि वैष्णवीचे भांडण झाले. त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे" असा खळबळजनक दावाच अॅड. विपुल दुशी यांनी केला.

संपूर्ण राज्याला वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने हादरवून सोडलय. हगवणे कुटुंब सध्या पोलीस कोठडीत आहे. न्यायालयासमोर हगवणे कुटुंबाची बाजू मांडणारा वकिल विपुल दुशी याने या प्रकरणात काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे विपुल दुशीवर चौफेर टीका सुरु झाली आहे. वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन आम्ही केलेलं नाही, असं स्पष्टीकरणही विपुल दुशीने दिलय. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वकिल विपुल दुशीवर जोरदार हल्ला चढवलाय.
विपुल दुशी घरगुती हिंसाचाराच समर्थन करतात का? असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. “प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, त्याला हत्यार म्हणायचं का? प्लास्टिकच्या छडीने कोणाची हत्या होत असेल, तर त्याला हत्यार म्हणतात” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं छळ आहे का? तुम्ह वाट्टेल ते जे बोलला, घरगुती हिंसाचाराच समर्थन करताय का? पुणे बार असोशिएशनने सनद रद्द करण्यासाठी तातडीने पाऊल उचललं पाहिजे” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
महादिग्गज विपुल दुशी कोण?
“तीन वकिल आहेत, तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्याची केस होती. त्यात त्यांना बेल मिळाली हा पहिला गुन्हा आहे. हे विपुल दुशी कोण आहेत, ते लोकांसमोर जाऊंदे. एका जिल्हापरिषदेच्या शाळेतली 39 मुलींच्या विनयभंगाची केस होती. एका मुख्याध्यापकाने शाळेतल्या शिक्षकावर केली होती. ती केस लढून त्यांना पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशी आहेत” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
विपुल दुशीने कोर्टात काय युक्तीवाद केला?
हगवणे कुटुंबाचे वकील अॅड. विपुल दुशी यांनी, वैष्णवी एका अन्य व्यक्तीशी चॅटवर बोलत होती, असा खळबळजनक युक्तिवाद केला. “वैष्णवीचा स्वभाव हा आत्महत्या करण्याचाच होता. तिने याआधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला” असा दावा अॅड. विपुल दुशी यांनी न्यायालयात केला. “आम्ही वैष्णवी हगवणे यांचे चारित्र्यहनन केलेलं नाही. वैष्णवी एका वेगळ्या व्यक्तीशी चॅट करत होती. त्या व्यक्तीचे आणि वैष्णवीचे भांडण झाले. त्यातूनच तिने आत्महत्या केली आहे” असा खळबळजनक दावाच अॅड. विपुल दुशी यांनी केला.
