
विजय गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, विरार | 23 ऑक्टोबर 2023 : शहरात फेरीवाल्यांची दादगिरी वाढत चालली आहे. रस्त्याच्या मधोमध हातगाड्या लावून, तसेच फूटपाथवरही आपला विकायला ठेवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची गैरसोय होते. साधं चालणं कठीण होतं, वाहनांचा वापर करणं तर खूप दूरची गोष्ट… पोलिस आणि संबंधित विभागाच्या कारवाईनंतरही फेरीवाले काही रस्त्यावरून हटत नाहीत.
या सर्वांमुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतानाच रात्री फेरीवाल्यांच्या राड्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विरारमध्ये रात्री उशीराच्या सुमारास नशेतील फेरीवाल्यांनी भर रस्त्यात गोंधळ माजवला, तसेच गिऱ्हाईकांसोबत हुज्जतही घातली.
नेमकं काय झालं ?
विरार पूर्वकडील मनवेलपाडा रोडवरील बँक ऑफ बडोदा समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. तेथे रस्त्यावर दोन मोसंबी विक्रेत्यांनी हातगाडी लावली होती. मात्र ते दोघेही दारूच्या नशेत बेधुंद होते. त्याच नशेत त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांशी हुज्जत घालत मोठा गोंधळ घालायला सुरूवात केली.
दारूच्या नशेत असलेले ते दोघे काहीही बडबड करत होते, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबत वाद घालत होते. इतर काही विक्रेत्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न के ला खरा पण हे दोन्ही विक्रेते दारूच्या नशेत असल्याने त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांची बडबड सुरूच होती. या दोन नशेतील बेधुंद फेरीवाल्यांमुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनाही फुकट चा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान विरार पूर्व डी मार्ट , बडोदा बँक, विरार नालासोपारा लिंक वर रात्री उशिरापर्यंत फेरीवाले उभा राहून, रस्त्यातून हातगाडी चालवणे, मोठ्याने बोलणे हे प्रकार सर्रास सुरू असतात. पण त्यामुळे सामान्य लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्रास होतो. त्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने अशा फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.