
पती-पत्नीचं नातं विश्वासाचं आणि प्रेमाचं. याच जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म एकमेकांची साथ मिळावी अशी कामना अनेक जोडप्यांची असते. पण तेलंगणच्या हैदराबादमध्ये उफराटचं घडलं, तिथे एका महिलेने स्वत:च्याचं हाताने तिचं कुंकू पुसलं. तिने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. त्या महिलेने प्रियकरासह मिळून तिच्या पतीची हत्या केली. मात्र नंतर त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं तिने भासवण्याचा प्रयत्न केला. अखेर तिचं बिंग फुटलंच आणि खून उघडकीस आला. मारेकरी महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर मात्र अद्याप फरार आहे. पोलनिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेलेला शेखर असे मृताचे आहे. आरोपी महिलेचे नाव चिट्टी आहे तर हरीश असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. जेलेला शेखर हा त्याची पत्नी चिट्टीसोबत हैदराबाद शहरातील सरूरनगर येथील कोडंडराम नगरमध्ये राहत होता, त्या दोघांचं 16 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्यांना 2 मुलंही आहे. शेखर हा कॅब ड्रायव्हर होता. टॅक्सी चालवून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा.
पतीच्या गैरहजेरीत सुरू झालं अफेअर
गरज पडल्यास भाड्यासाठी जेलेला शेखर लांबही जायचा. या सगळ्या दरम्यान, त्याच्या पत्नीचा, चिट्टीचा हरीश नावाच्या व्यक्तीशी संपर्क आला. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर त्यांच्यात अफेअर सुरू झाले. दोघांमधील अफेअर बरेच दिवस गुपचूप चालू राहिले. पण एक दिवस शेखरला संशय आला आणि त्याने पत्नीवर नजर ठेवण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याला पत्नीच्या अफेअरबद्दल समजलं.
जेलेला शेखरने त्याची पत्नी चिट्टीला याबद्दल फटकारले. पती आपल्या प्रेमात अडथळा ठरतल असल्याचे चिट्टी आणि प्रियकर हरीशला समजलं, आणि त्यांनी त्याचा काटा काढण्याचा, त्याला मारण्याचा कट रचला. हत्येच्या दिवशी जेलेला शेखरकाम करून घरी आला आणि जेवून झोपी गेला. मात्र तो गाढ झोपेत असतानाच चिट्टीने प्रियकर हरीशला फोन करून घरी बोलावलं.
पतीच्या हत्येनंतर 100 नंबरवर फोन करून दिली सूचना
त्यांनी शेखरचा गळा दाबला आणि नंतर त्याच्या डोक्यावर काठीने जोरात प्रहार केला. मात्र कोणालाही संशय येऊ नये म्हणून पत्नी चिट्टीने 100 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. सरूरनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेलेला शेखरला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले. त्यानंतर पोलिसांनी शेखरचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयाच्या शवागारात ठेवला.
संशय आल्याने पोलिसांनी शेखरची पत्नी चिट्टीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिच्या पतीला हृदयविकाराचा झटका आला होता आणि गाढ झोपेत असताना त्याचा मृत्यू झाला, असं तिने सांगितलं. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवतल कठोरपणे तिची चौकशी केली असता तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. त्या दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू होता, असे नातेवाईकांनी सांगितलं. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी पत्नी चिट्टी पोलिस कोठडीत असून फरार प्रियकर हरीशचा पोलिस शोध घेत आहेत.