
प्रसुती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने रक्तस्राव सुरु झाल्याने पालघर येथील २२ वर्षीय महिलेला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या महिलेला सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तोपर्यंत रक्तस्रावाने या महिलेचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने पालघर तालुक्यातील धुकटन गावातील २२ वर्षीय महिलेला ( प्रिती जाधव ) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिल्वासा येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान प्रिती जाधव यांचा मृत्यू झाला आहे. प्रसूती दरम्यान या महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने युटेरियन इन्व्हर्जनमुळे रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यानंतर या महिलेला तातडीने सिल्वासा येथे हलवण्यात आले. परंतू येथे गेल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.
या प्रकरणात प्रसुतीनंतर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या महिलेचे पती राहुल जाधव यांनी केला आहे. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सिल्वासा येथील रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असे सांगत कारवाईची मागणी राहुल जाधव यांनी केली आहे. मयत प्रिती जाधव यांना प्रसूती वेदना सुरु झाल्याने रविवारी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर झाल्याचे आणि वेळेत रुग्णवाहिका मिळाली नसल्याने आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचे पती राहुल जाधव यांनी केला आहे.
प्रसूती दरम्यान पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने युटेरिय इन्व्हर्जनमुळे रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे पुढील स्त्रीरोग तज्ञांनी महिलेला उपचारासाठी सिल्वासा येथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. महिलेला डॉक्टरांसह सिल्वासा येथे पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाईल असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.