
सासू-सुनेचे नातं कधी गोड तर कधी नोकझोकवालं असतं. काही घरात सासू-सुनेचं प्रचंड गूळपीठ असतं, पण काही घरात तर दोघी एकमेकींसोबत एकाच खोलीत राहूही शकत नाही. सासून सुनेचा छळ केल्याच्या अनेक घटनांबद्दल आपण ऐकलं असेल पण उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक सूनबाई तर सगळ्यात शातीर निघाली. तिथे एका सुनेने तिच्या सासूच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी ती 1.50 लाखही मोजणार होती. मात्र सुदैवाने तिच्या सासूचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
बरं हत्येची ही सुपारी देण्यामागचं कारणंही धक्कादायक आहे. खरंतर त्या महिलेच्या सावत्र सासूने एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यामुळे आपल्या संपत्तीत वाटेकरी यायला नको या विचाराने ती महिला अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने तिच्या सासूचाच काटा काढण्याचं ठरवलं आणि भयंकर प्लान रचला. मात्र सासूचा जीव वाचला आणि सुपारी देणारी सून पकडली गेली.
नेमकं काय झालं ?
एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आरोपी महिला कोमल ही तिची सावत्र सासू सीमा देवीवर खूप चिडली होती. त्याचं कारण म्हणजे सीमा देवी यांनी एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र कोमलला भीती वाटत होती होती की दुसरं मूल घरात आल्यामुळे मालमत्तेतील तिचा वाटा कमी होईल. यामुळे तिने तिच्या सावत्र सासूची हत्या करण्याची सुपारी दिली होती.
त्यानंतर कोमलने तिच्या भावासोबत मिळून कट रचला. तिने हत्येसाठी त्याला दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. 12 ऑक्टोबर रोजी तिचा भाऊ, भव्या हा मास्क घालून कोमलच्या सरधना येथील घरात घुसला आणि सीमा देवीवर गोळी झाडली. मात्र ती गोळी सीमा देवी यांच्या पायाला लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या, पण त्यांचा जीव वाचला.
अशी झाली पोलखोल
या हल्ल्यानंतर सीमा देवीचे पती मुकेश चंद यांनी सरधना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन विशेष पथके आणि एक SWAT (ग्रामीण) युनिट स्थापन केले. बराच तपास करून भव्यला पकडण्यात आले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की गुन्ह्यात वापरलेलं .32 बोरचे पिस्तूल त्याला त्याचा मित्र हर्षितने दिले होते.
भव्यने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी हर्षितलाही अटक केली आणि शस्त्र जप्त केले. संयुक्त कारवाईत कोमल, भव्य आणि हर्षित या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तिघांच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत आणि मालमत्तेच्या वादाच्या इतर पैलूंचा तपास सुरू असल्याचे मेरठ ग्रामीण भागातील एसपींनी सांगितले. यामुळे मोठ्या कटाचा खुलासा झाला आहे.