वडील गंभीर आहेत, हॉस्पिटलचा फोन, 30 किमी अंतर गाठून मुलगा पोहोचला आणि…

| Updated on: Apr 02, 2021 | 11:01 AM

(Yawatmal Man announced Dead by Hospital )

वडील गंभीर आहेत, हॉस्पिटलचा फोन, 30 किमी अंतर गाठून मुलगा पोहोचला आणि...
यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाने रुग्णाला जिवंतपणीच मृत घोषित केले
Follow us on

यवतमाळ : यवतमाळमधील वसंतराव शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिवंतपणी मृत घोषित करण्याचा प्रकार काल मध्यरात्री उघडकीस आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित रुग्ण हा ऑक्सिजन लावून उपचार घेत असल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाने आज या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार वजा निवेदन दिले. (Yawatmal Man announced Dead by Government Hospital son found him alive)

निमोनियाची लक्षणे आणि ऑक्सिजन लेवल कमी

बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र कावणकर यांचे वडील ज्ञानेश्वर कावणकर यांना आजारपणामुळे 30 मार्चला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निमोनियाची लक्षणे आणि ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन वार्ड क्रमांक 19 मध्ये उपचारार्थ दाखल करुन घेतले.

वडिलांच्या हृदयाचे ठोके वाढल्याचा फोन

कोरोना स्थितीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे त्याच वॉर्डात काल सकाळपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांना वॉर्ड क्रमांक 25 मध्ये (कोव्हिड) दाखल करुन घेतले. तशी माहिती देखील कुटुंबियांना देण्यात आली. उपचार सुरु असतानाच 31 मार्चला रात्री अकरा ते बारा वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या कोव्हिड वॉर्डातून देवेंद्र कावणकर यांना फोन करण्याता आला. तुमच्या वडिलांच्या हृदयाचे ठोके वाढले असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली.

30 किलोमीटर अंतर पार करून मुलगा रुग्णालयात

वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची बाब कानी पडताच देवेंद्र यांनी तात्काळ 30 किलोमीटर अंतर पार करून यवतमाळ गाठले आणि थेट कोव्हिड वॉर्डात जाऊन विचारपूस केली. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र हे मृत वडिलांचे शरीर पाहण्यासाठी गेले असता साक्षात त्यांचे वडील ऑक्सिजन लावून बेडवर उपचार घेत असल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. परंतु संबंधित डॉक्टरांनी चुकीची माहिती दिल्यामुळे कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारांचा निष्काळजीपणा पुढे आला असून यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल प्रलंबित होता. असे असताना त्यांच्यावर कोव्हिड वॉर्डात उपचार सुरु करण्यात आले. 10 ते 12 तास कोव्हिड वॉर्डमधे उपचार घेतल्यानंतर त्यांच्या मृत्यूची चुकीची माहिती देण्यात आली. त्यानंतर एक एप्रिलला सकाळी संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत कोविडची लस घेतल्यानंतर दीड तासात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन

(Yawatmal Man announced Dead by Government Hospital son found him alive)