गर्लफ्रेंडला द्यायचे होते गिफ्ट, म्हणून त्याने शाळेतून चोरले लाखो रुपये, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
UP News : शाळेत चोरी करणारी व्यक्ती शाळेतच चालक म्हणून काम करते आणि स्कूल व्हॅनचा चालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शामली : प्रेम आंधळ असतं (love is blind)असं म्हणतात. प्रेमात एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये घडली आहे. प्रेयसीला गिफ्ट देता यावे म्हणून एका तरूणाने साथीदारासह शाळेत लाखो रुपयांची (stole money from school) चोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे संपूर्ण प्रकरण शामली जिल्ह्यातील सदर कोतवाली भागाशी संबंधित आहे. जिथे 17/18 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलमध्ये चोरी केली. आणि शाळेच्या कॅश काउंटरमध्ये ठेवलेले सुमारे 6.5 लाख रुपयांची रोकड पळवून नेली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, ही घटना एखाद्या जाणकार व्यक्तीने घडवून आणल्याचे पोलिसांना जाणवले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर स्रोतांवरून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, ज्या व्यक्तीने शाळेत चोरीची घटना घडवली आहे तो शाळेतच चालक म्हणून काम करतो आणि तो स्कूल व्हॅनचा चालक आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, सुफियान नावाच्या व्यक्तीने त्याचा मित्र वसीमसोबत मिळून चोरीची घटना घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत सुफियानने सांगितले की, चोरी करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, परंतु ईदचा सण त्याच्या डोक्यावर होता, त्यामुळे त्याला आपल्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचे होते, म्हणूनच त्याने हे कृत्य केले.
त्याने आपल्या साथीदारासह शाळेत चोरीची घटना घडवून आणण्याचा कट रचला. कारण तो शाळेतच ड्रायव्हर म्हणून काम करत असे, त्यामुळे त्याला कोणत्या काउंटरवरून पगार मिळतो आणि रोकड कुठे ठेवली जाते हे त्याला माहीत होते. त्यानंतर त्याने साथीदारासह चोरीचा प्लॅन आखला आणि चोरी केलीही. त्याने मागील बाजूने शाळेत प्रवेश केला आणि त्यानंतर कॅश काउंटरच्या खोलीच्या खिडकीची काच स्क्रू ड्रायव्हरने उचकटून तेथून आत प्रवेश केला आणि हा रोकड लांबवून तो फरार झाला.
या प्रकरणाबाबत पोलिस म्हणाले की, आरोपी सुफियानने सांगितले की, त्याने चोरी केली त्याच रात्री त्याने चोरीची रक्कम दोन भागात विभागली आणि सुमारे दीड लाख रुपये आपल्याजवळ ठेवले होते. उर्वरित 50 हजार रुपये त्याने साथीदाराला दिले होते. चोरीच्या घटनेनंतर त्याच्याकडे राहिलेल्या पैशांचे गिफ्ट पॅक त्याने बनवले आणि जाऊन जवळच्या गावातील मैत्रिणीला दिले आणि मी सांगेपर्यंत हे गिफ्ट उघडू नकोस असे सांगितले.आणि ही भेट तुझी ईदचे गिफ्ट आहे, असेही तो म्हणाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
