Rat Death : उंदराला नाल्यात बुडवून मारणारा तरुण अटकेत..मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस करणार पोस्टमार्टम..

Rat Death : उंदराचा जीव घेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे..

Rat Death : उंदराला नाल्यात बुडवून मारणारा तरुण अटकेत..मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस करणार पोस्टमार्टम..
तरुणाला अटक
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 26, 2022 | 9:22 PM

बदायू, उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातून (Utter Pradesh) एक विचित्र घटना समोर आली आहे. बदायू येथे एका तरुणाने उंदराचा जीव (Rat Killing) घेतला, त्यावरुन पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर याप्रकरणातील आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक (Youth Arrested) केली आहे. या उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन (Postmortem) करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

एका तरुणाने अटक केलेल्या तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, हा तरुण उंदराच्या जीवाशी खेळत होता. त्याने त्याला बांधून एका नाल्यात डुबवित होता. हा प्रकार सुरु असताना तरुणाने त्याला विरोध केला. पण आरोपी थांबला नाही. तो उंदराच्या जीवाशी खेळतच होता.

विरोध केल्यानंतरही आरोपीने कहर केला. आरोपीने एका फरशीच्या तुकड्याला बांधलेल्या उंदराला नाल्यात फेकून दिले. त्यामुळे हा उंदीर मृत झाला. उंदराच्या मृत्यूला हा आरोपीच दोषी असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.

विकेंद्र शर्मा या तरुणाने आरोपी मनोज कुमारविरोधात तक्रार दिली होती. शर्मा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आरोपीला त्यांनी उंदराला सोडण्याची विनंती केली होती. पण आरोपीने त्यांना प्रतिसाद न देता त्याचा जीव घेतला. त्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी प्रकरणात प्राणी क्रुरता अधिनियमानुसार, गुन्हा दाखल केला आहे. तर उंदराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे पोर्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे पोलिसांना आरोपीविरोधात पुरावा गोळा करता येणार आहे.

बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत उंदराचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी एसी टॅक्सीचे 1500 रुपये भाडेही दिले. तसेच शवविच्छेदनासाठी आवश्यक 225 रुपयांची पावती ही फाडल्याचे दैनिक भास्करने वृत्त दिले आहे.

उंदराला एका दोरीने बांधण्यात आले होते. आरोपी उंदराला नाल्यात डुबवत होता आणि बाहेर काढत होता. तक्रारदार शर्मा यांनी त्याला असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीचा उंदरासोबतचा खेळ सुरुच होता.

आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने उंदराला सोडण्याऐवजी नाल्यात फेकून दिले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.