Maharashtra Board SSC 10th Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर; ‘हा’ विभाग तळाशी, पहा टक्केवारी
बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के इतकी आहे. तर नऊ विभागीय मंडळांपैकी नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वल ठरलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीच्या निकालाची काही वैशिष्ट्ये पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. यावेळी त्यांनी विभागीय टक्केवारी देखील सांगितली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दहावीच्या निकालात कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली असून नागपूर विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी असे हे नऊ विभागीय मंडळ आहेत.
नऊ विभागीय मंडळांची उत्तीर्णतेची टक्केवारी-
- कोकण – 98.82%
- कोल्हापूर – 96.87%
- मुंबई – 95.84%
- पुणे – 94.81%
- नाशिक – 93.04%
- अमरावती – 92.95%
- छत्रपती संभाजीनगर – 92.82%
- लातूर – 92.77%
- नागपूर – 90.78%
नेहमीप्रमाणे दहावी बोर्डाच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के असून मुलांची टक्केवारी ही 92.31 टक्के इतकी आहे. या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या चार वर्षांचा दहावीचा निकाल-
2022- 96.94% 2023 – 93/83% 2024 – 95.81% 2025 – 94.10%
गेल्यावर्षी पेक्षा यावर्षीच्या निकालाची टक्केवारी 1.71 टक्क्यांनी कमी झाली आहे. यंदा राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत दहा दिवस लवकर घेतल्या. तसंच निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात यंदा घट झाल्यामुळे दहावीचा निकाल वाढणार की घटणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु बारावीप्रमाणेच दहावीचाही निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे.
यंदाच्या निकालात 100 टक्के मिळवलेले विद्यार्थी 211 आहेत. त्यापैकी पुण्यातील 13, नागपूरमधील 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 40, मुंबईत 8, कोल्हापूरमध्ये 12, अमरावतीत 11, नाशिकमध्ये 2, लातूरमध्ये 113 आणि कोकणात 9 आहेत. तर एकूण 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत.