कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात, कुठून लढणार निवडणूक?

कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. आता अभिजीत बिचुकले कुठून निवडणूक लढणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या सविस्तर...

कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात, कुठून लढणार निवडणूक?
Abhijit Bichukale
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Nov 15, 2025 | 4:37 PM

सध्या राज्यात नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात 246 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा करताच नगरपरिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरताना दिसत आहेत. दरम्यान, कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. आता अभिजीत बिचुकले कुठून निवडणूक लढणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कुठून निवडणूक लढणार?

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. 17 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी साताऱ्याचे कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रथमच सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज भरल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

साताऱ्यामध्ये मागील 25 वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची झालेली चाळण, बागांची दुरावस्था मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकलेल्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक बनवायचंय बरोबरच साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने सातारकरांनी मला नगराध्यक्ष बनवा‘, असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे. मी माझी सौभ्यावती अलंकृता बिचुकले यांचा प्रचाक करत होतो. म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करुन मला नोकरीवरुन काढले. एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला होता. सातारा नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली बाहेर काढायची आहेत. अभिजित बिचुकले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार?

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.