भाजपसोबत घरोबा नकोच, एमआयमचा भाजपला मोठा धक्का! घेतला मोठा निर्णय

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत बसणार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच भाजप सोबत कुठेही युती होणार नाही असे म्हटले आहे.

भाजपसोबत घरोबा नकोच, एमआयमचा भाजपला मोठा धक्का! घेतला मोठा निर्णय
Imtiyaz Jalil
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 07, 2026 | 2:50 PM

अकोल्यातील राजकीय प्रयोग हे काही नवीन राहीलेले नाहीत. पण अकोट येथील पॅटर्नने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. तसेच भाजपवर चोहोबाजूंनी टीका होताना दिसत आहे. दरम्यान, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत बसणार नाही हे आम्ही स्पष्ट करुन देतो असे म्हटले आहे.

आघाडीतून बाहेर पडण्याचे सप्त आदेश

माध्यमाशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, विकास मंच अशी आघाडी त्या ठिकाणी झाली होती आणि विकास व्हावा म्हणून आमचे त्या ठिकाणचे पदाधिकारी भाजपसोबत गेले असावेत. मात्र त्यांना त्या आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट आदेश आमच्याकडून देण्यात आले आहेत. भाजप सोबत कुठेही युती होणार नाही. विकास नाही झाला तरी चालेल तो आमच्यासाठी दुसरा मुद्दा आहे पण जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही.

पुढे इम्तियाज जलील म्हणाले की, आमचे त्या ठिकाणचे उमेदवार कुठेही पक्ष सोडून गेलेले नाही. त्यांनी आम्हाला जाण्याच्या अगोदर विश्वासात घेतले नाही एवढीच त्यांची चुकी. शिवसेना बच्चू कडू आणि इतर पक्ष देखील त्या ठिकाणी सोबत गेलेले आहे. आम्ही भाजप सोबत कुठेही जाणार नाही विकास नाही झाला तरी चालेल. राजकारण आहे राजकारणात विरोध होतोच, आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी इथे आलो आहे मी विरोध करणाऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. 16 तारखेला स्पष्ट होईल काळे झेंडे काय असतात आणि हिरवे झेंडे.

अकोट पॅटर्नची राज्यभर चर्चा

अकोटमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या माया धुळे या नगराध्यक्ष बनल्या. बहुमाताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली. अकोट विकास मंचाचा हा प्रयोग राज्यात गाजला. कारण या मंचात भाजप 11 जागांसहीत आघाडीवर आहे. तर एमआयएम 5 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत आहे. या मंचात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे नगरसेवक आहेत. अकोटमध्ये एकूण 33 सदस्य आहेत. त्यात अकोट विकास मंचाचे 25 सदस्य आणि नगराध्यक्ष पदाच्या माया धुळे मिळून 26 जण झाले आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य हे विरोधी गोटात असतील.