कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेत वाद कायम, भाजपच्या दाव्यावर शिवसेना नेत्याचं उत्तर

| Updated on: Jun 10, 2023 | 9:34 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेत वाद कायम, भाजपच्या दाव्यावर शिवसेना नेत्याचं उत्तर
Follow us on

सुनील जाधव, कल्याण : गेल्या दोन दिवसापासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा वाद सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनाच निवडून आणण्याचा दावा त्यांनी केला. मात्र त्यानंतर ही अजून हा वाद शांत झालेला नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकामेकांवरती टीका करत आहेत. भाजपने कल्याण लोकसभा प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या शशिकांत कांबळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेत पडलेल्या मतांमध्ये सर्वात जास्त भाजपची मते असल्याचा दावा केला होता.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते दीपेश म्हात्रे यांनी यावर उत्तर दिले आहे. स्थानिक पदाधिकारी युतीमध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जी मत पडली होती ती कल्याण लोकसभेत त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर पडली असे मत त्यांनी मांडले आहे.

‘भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असण्याचं कारण नाही. या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे झपाट्याने काम करतात. प्रत्येक विकास कामांमध्ये भाजपच्या नेत्याला घेऊन काम करतात. भाजपच्या काही लोकांनी मोर्चा काढला होता की त्यांच्या एका पदाधिकारी वर गुन्हा दाखल झाला. जो गुन्हा दाखल झालाय त्याची शहानिशा पोलीस करतील. जर तो खोटा गुन्हा असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.’ असं देखील दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वभाव सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व असा आहे. कुठल्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांनी टाकलेला नाही. काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या माध्यमातून दबाव येतोय हे चुक आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे जर गुन्हा खोटा असेल तर त्यांना एवढं घाबरण्याचं कारणच नाही.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनी सत्तेत असून ही आपल्याला योग्य तो न्याय मिळत नसल्याचा दावा केला आहे. भाजपच्या आमदारांना निधी दिला जात नाहीये. पोलिसांकडून भाजप नेत्यांना त्रास दिला जात आहे. यामागे श्रीकांत शिंदे असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेसोबत असहकार्याचा ठराव भाजप नेत्यांनी मांडला होता.