Punjab Election 2022 : भाजपच्या प्रचाराचं रणशिंग पंतप्रधान मोदी फुंकणार, पंजाबमध्ये भाजप किती जागा लढणार?

| Updated on: Dec 23, 2021 | 8:53 PM

पंजाबमध्ये घोषित होणाऱ्या योजना आणि त्याच्या लाभार्थ्यांची माहिती तयार केली जात आहे. या योजनांच्या आधारे भाजप लोकांना मत मागेल. पंजाबमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून नवा नारा दिला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. हा नारा 'नवा पंजाब, बीजेपी दे नाल', असा असू शकतो.

Punjab Election 2022 : भाजपच्या प्रचाराचं रणशिंग पंतप्रधान मोदी फुंकणार, पंजाबमध्ये भाजप किती जागा लढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भाजपच्या प्रचाराचं रणशिंग नव्या वर्षात मोठ्या रॅलीने पुकारणार असल्याची माहिती मिळतेय. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशसह पंजाबमध्येही मोठ्या योजनांची घोषणा करु शकतात. पंजाबमध्ये घोषित होणाऱ्या योजना आणि त्याच्या लाभार्थ्यांची माहिती तयार केली जात आहे. या योजनांच्या आधारे भाजप लोकांना मत मागेल. पंजाबमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून नवा नारा दिला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. हा नारा ‘नवा पंजाब, बीजेपी दे नाल’, असा असू शकतो.

पंजाबसाठी भाजपची काय तयारी?

भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये पुढील सरकार भाजपशिवाय बनणार नाही अशी रणनिती आखली जात आहे. पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलासोबत युती तुटल्यानंतर आता भाजप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत आहे. ही युती पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकेल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

भाजप पंजाब विधानसभेतील 117 पैकी 70 जागा लढण्याची योजना आखत आहे. अकाली दलासोबत युतीमध्ये भाजप 23 जागांवर निवडणूक लढत होती. आता भाजप अमरिंदर सिंह यांच्या पक्षाला 30 ते 35 आणि ढिंढसा यांच्या पक्षाला 15 जागा दिल्या जाऊ शकतात.

भाजपला पंजाबमध्ये मोठी अपेक्षा

काँग्रेसला रामराम केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी मागील महिन्यात पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी मागील आठवड्यात सांगितलं होतं की भाजपसोबत युती झाली आहे. तर जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची त्यांनी सांगितलं होतं. भाजप आणि पंजाब लोक काँग्रेसमध्ये युती होण्यापूर्वी चर्चेच्या 9 फेऱ्या पार पडल्या होत्या.

कृषी कायदे मागे घेतल्यानं भाजपला पोषक वातावरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर पंजाबमध्ये भाजपची मतं वाढण्यास मदत होईल, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जवळपास 15 महिने धरणं आंदोलन केलं होतं. भाजपच्या मते शेतकऱ्यांच्या मतांची वाटणी होईल आणि त्यामुळे काँग्रेसला सर्वाधिक नुकसान होईल. कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंजाबमधील वातावरण बदललं आहे. त्यामुळे भाजपला पंजाबमध्ये विरोधाचा सामना करण्याची वेळ येणार नाही.

पंजाबमध्ये भाजप आतापर्यंत शहरी आणि हिंदू समाजाचा पक्ष मानलं जात होतं. मात्र, अमरिंदर सिंह आणि सुखदेव ढिंढसा यांच्यामुळे आता भाजपला शिख समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

‘इथे भ्रष्टता, तिथे नष्टता… शंखच पोकळ फुंकू नका’, कुसुमाग्रजांच्या कवितेच्या सहाय्यानं फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

ओमिक्रॉन विरुद्धचं युद्ध सुरू! नाईट कर्फ्यूपासून ते उत्सवांवर बंदी; केंद्राच्या राज्यांना आणखी काय काय सूचना