
Wednesday : चित्रपटासोबतच आता ओटीटी हे मनोरंजनाचं तिसरं आणि सर्वात प्रभावी माध्यम बनलं आहे. दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव नवीन चित्रपट, वेब सीरीज आणि वेगवेगळे शो रिलीज होत असतात. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी असे सर्व चित्रपट एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने याचा प्रेक्षकांना भरपूर फायदा होत आहे. त्यामुळे ओटीटीवरील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेगळ्या आणि हटके वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत, जी गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर आपली पकड मजबूत ठेवून आहे. ही सीरीज हॉरर आणि अनेक रहस्यांनी भरलेली असून आजही प्रेक्षक ती वारंवार पाहत आहेत. याच लोकप्रियतेमुळे ही सीरीज आजही ओटीटीवर ट्रेंड करत आहे.
‘वेडनेसडे’चा ओटीटीवर कब्जा
नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणाऱ्या या सीरीजचं नाव आहे ‘वेडनेसडे’. ही सीरीज आजही प्रेक्षकांचा थरकाप उडवण्याचं काम करत आहे. ‘वेडनेसडे’चा पहिला सीझन नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या पहिल्या सीझनमध्ये एकूण 8 एपिसोड आहेत. या सीरीजची निर्मिती अल्फ्रेड गफ आणि माइल्स मिलर यांनी केली आहे. तर प्रसिद्ध कार्टूनिस्ट चार्ल्स अॅडम्स यांच्या ‘वेडनेसडे’ या पात्रावर ही कथा आधारित आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. विशेष म्हणजे पहिल्या सीझनमधील चार एपिसोड्सचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक टिम बर्टन यांनी केलं होतं.
पहिल्या सीझननंतर तब्बल तीन वर्षांनी ‘वेडनेसडे’चा दुसरा सीझन ऑगस्ट 2025 मध्ये प्रदर्शित झाला. हा सीझन स्टॅगर्ड फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आला होता. दुसऱ्या सीझनमध्येही एकूण 8 एपिसोड आहेत. यापैकी उर्वरित चार एपिसोड सप्टेंबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले.
या सीरीजमध्ये अभिनेत्री जेना ऑर्टेगा हिने वेडनेसडेची प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. तिच्यासोबतच एम्मा मायर्स, हंटर डूहन, जॉय संडे आणि कॅथरिन झेटा-जोन्स यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
IMDb रेटिंग आणि लोकप्रियता
‘वेडनेसडे’ या सीरीजला IMDB वर 10 पैकी 8 रेटिंग मिळाली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरीज हिंदी डबिंग आणि सबटायटल्ससह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून ही सीरीज सतत ट्रेंड करत असून आतापर्यंत तिला 371 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.