
आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटातील मिलीमीटर तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात मिलीमीटरची भूमिका तशी छोटीच होती, पण त्यातही त्याने विशेष छाप सोडली होती. ही भूमिका साकारलेला राहुल कुमार आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. राहुल कुमार लग्नबंधनात अडकला असून त्याची पत्नी तुर्कीची आहे. राहुलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये तो पत्नीची ओळख करून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी राहुलच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर जाऊन त्याला शुभेच्छा देत आहेत.
या व्हिडीओमध्ये राहुल सांगतोय, “हाय, मी राहुल आहे. ही माझी पत्नी केजीबन आहे. ती तुर्कीची आहे.” यानंतर त्याची पत्नी स्मितहास्य करत सांगते, “होय आणि आम्ही 4 मे रोजी लग्न केलंय.” राहुलला त्याची जोडीदारसुद्धा ‘3 इडियट्स’मधील भूमिकेमुळेच भेटली आहे. या चित्रपटात राहुलचं काम पाहिल्यानंतर केजीबनने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जवळपास 14 वर्षांपूर्वी ‘3 इडियट्स’च्या मिलीमीटरची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
राहुलच्या इन्स्टाग्रामवर आमिर खानशिवाय बॉलिवूडमधील इतर कलाकारांसोबतचेही फोटो पहायला मिळतात. राजू हिरानी, शाहरुख खान आणि बोमन इराणी यांच्यासोबतचे फोटो त्याने शेअर केले आहेत. राहुलने ‘बंदिश बँडिट्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्येही काम केलंय. पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘आम्ही जिंकलो’. त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. ‘मिलीमीटर आता किलोमीटर बनला आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा तर कुणाल खेमूसारखा दिसतोय’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘जहांपनाह.. तौफा कुबूल किया?’ असाही डायलॉग एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे.
2009 मध्ये आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये एका इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये छोटीमोठी कामं करणाऱ्या ‘मिलीमीटर’ची भूमिका राहुलने साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. शिवाय ‘मिलीमीटर’ हे भूमिकेचं अनोखं नावसुद्धा चांगलंच गाजलं.