नाराज असतानाच नाना पाटेकरांनी या गाण्यात केलेला पहिल्यांदा डान्स, गाणं ठरलेलं ब्लॉकबस्टर, आजही प्रत्येक पार्टीत वाजतं
नाराज असताना देखील नाना पाटेकर यांनी 33 वर्षांपूर्वी या गाण्यावर केलेला पहिल्यांदाच डान्स. आजही हे गाणं प्रत्येक पार्टीची आहे शान. लोक पार्टीमध्ये हेच गाणं वाजवायला सांगतात.

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी आणि गंभीर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पडद्यावर त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, 90च्या दशकातील एका गाण्यात नाना पाटेकरांचा चक्क मस्तीभरा आणि डान्स करतानाचा अंदाज पाहायला मिळाला होता.
हे गाणे म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटातील ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’. विशेष म्हणजे, हे नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील पहिल्या डान्स सीक्वेन्सपैकी एक होते. यापूर्वी त्यांनी पडद्यावर अशाप्रकारे डान्स केला नव्हता. त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगवेळी नाना पाटेकर काहीसे नाराज असल्याचे सांगितले जाते.
राज कुमारसोबत नाना पाटेकरांचा मस्तीभरा अंदाज
‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेते राज कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’ या गाण्यात दोघांचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळतो. मैत्री, पार्टी आणि जल्लोषाचे वातावरण असलेले हे गाणे त्याकाळी चांगलेच लोकप्रिय झाले होते.
या गाण्याला मोहम्मद रफी आणि सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता. संतोष आनंद यांनी गाण्याचे बोल लिहिले असून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.
पडद्यावर मैत्री, पण सेटवर मात्र फारसा संवाद नव्हता
गाण्यात नाना पाटेकर आणि राज कुमार यांच्यातील मैत्री आणि बॉन्डिंग पाहून प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडली. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांशी फारसे बोलत नसल्याचे सांगितले जाते. दोघेही आपापले सीन्स शूट केल्यानंतर आपल्या खोलीत जात असत.
विशेष म्हणजे, त्यांच्यातील हा कमी संवाद पडद्यावर मात्र अजिबात जाणवला नाही. उलट ‘पी ले पी ले’ या गाण्याच्या शूटिंगनंतर दोघांमध्ये काही प्रमाणात संवाद वाढल्याचेही सांगितले जाते.
33 वर्षांनंतरही गाण्याची क्रेझ कायम
‘पी ले पी ले ओ मोरे राजा’ हे गाणं आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. पार्टी आणि विशेषतः बॅचलर पार्टीमध्येही हे गाणे आवर्जून वाजवले जाते. यूट्यूबवर या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.