नवरा विदेशात जाताना पत्नीच्या मनातील वेदना व्यक्त करणारं गाणं, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी

43 वर्षांपूर्वीचं लता मंगेशकर यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे आपल्या नवऱ्याला परदेशात पाठविताना होणाऱ्या वेदना व्यक्त करते. आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे.

नवरा विदेशात जाताना पत्नीच्या मनातील वेदना व्यक्त करणारं गाणं, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 06, 2026 | 7:03 PM

70 आणि 80 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना अनेक अजरामर गाणी दिली. आजही रेडिओवर किंवा सोशल मीडियावर ही गाणी ऐकली की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. याच काळातील एक भावस्पर्शी गाणं म्हणजे ‘परदेस जाके परदेसिया’. प्रेम, विरह, समर्पण आणि त्यागाच्या भावना व्यक्त करणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.

1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्पण’ या चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री रीना रॉय आपल्या प्रियकराला, म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांना परदेशी जाण्यापूर्वी मनातील भावना व्यक्त करताना दिसतात. प्रियकर परदेशी गेल्यानंतर आपल्याला विसरू नये, अशी आर्त विनंती या गाण्यातून केली जाते.

या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजात स्वर दिला होता. गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या लोकप्रिय संगीतकार जोडीने त्याला संगीत दिलं. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हळुवारपणा आणि विरहाची भावना यामुळे हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं.

कुटुंबासाठी शोभाने केला मोठा त्याग

‘अर्पण’ची कथा देखील या गाण्याच्या भावनेशी जोडलेली आहे. चित्रपटात अनिल (जितेंद्र) आणि शोभा (रीना रॉय) एकमेकांवर प्रेम करत असतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, चांगल्या भविष्यासाठी अनिल परदेशी जातो. त्याच्या अनुपस्थितीत अनिलच्या बहिणीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात.

याच परिस्थितीचा फायदा घेत जे.के. (राज बब्बर) शोभाला ब्लॅकमेल करतो. कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि अनिलच्या बहिणीचं लग्न व्हावं यासाठी शोभा स्वतःच्या प्रेमाचा त्याग करते आणि जे.के.सोबत लग्न करण्याचा निर्णय घेते.

रीना रॉयच्या अभिनयासह संगीतासाठीही चित्रपटाची आठवण

‘अर्पण’मध्ये रीना रॉय आणि जितेंद्र यांच्यासोबत राज बब्बर आणि परवीन बाबी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. जे. ओम प्रकाश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. चित्रपटातील भावनिक कथा, रीना रॉय यांचा प्रभावी अभिनय आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत यामुळे ‘अर्पण’ आजही जुन्या हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे.

विशेष म्हणजे, ‘परदेस जाके परदेसिया’ हे केवळ एक प्रेमगीत नसून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी केलेला त्याग, विरहाची वेदना आणि नात्यांप्रती असलेलं समर्पण व्यक्त करणारं गाणं आहे. त्यामुळेच अनेक दशकांनंतरही या गाण्याची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us