लता मंगेशकरांचा आवाज ऐकून निर्मात्याने दिला नकार, पण नंतर तेच गाणं ठरलं सुपरहिट
लता मंगेशकर यांच्या आवाजाला निर्मात्याने दिला होता नकार. गुलाम हैदर यांनी दाखवला विश्वास, रेल्वे स्टेशनवर तयार झाली गाण्याची धून अन् गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची ओळख आजही अजरामर आहे. प्रेम, विरह आणि भावनांचे विविध रंग त्यांच्या आवाजातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. मात्र, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लता मंगेशकर यांनाही नकाराचा सामना करावा लागला होता. त्यांच्या आवाजाला एका चित्रपट निर्मात्याने ‘खूप बारीक’ असल्याचं सांगत नाकारलं होतं. अशा कठीण काळात संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनी त्यांच्या प्रतिभेवर विश्वास दाखवला. याच संघर्षातून पुढे 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘दिल मेरा तोड़ा, मुझे कहीं का न छोड़ा’ हे गाणं तयार झालं. ज्याने लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठला.
लता मंगेशकर यांना चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळवून देण्यासाठी मास्टर गुलाम हैदर यांनी त्यांची भेट चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी यांच्याशी घडवून आणली होती. मात्र, लता यांचा आवाज ऐकल्यानंतर तो खूप बारीक असल्याचं सांगत मुखर्जी यांनी त्यांना आपल्या चित्रपटासाठी योग्य मानलं नसल्याचं सांगितलं जातं. या नकारामुळे गुलाम हैदर निराश झाले असले तरी लता यांच्या गायनक्षमतेवर त्यांचा ठाम विश्वास होता.
गुलाम हैदर यांनी त्या वेळी लता मंगेशकर यांच्याबाबत मोठं भाकीत केल्याचंही सांगितलं जातं. भविष्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते लता यांच्याकडून गाणी गाऊन घेण्यासाठी रांगा लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पुढे लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं स्थान मिळवलं आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.
रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या डबीतून तयार झाली गाण्याची धून
या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्साही सांगितला जातो. शशधर मुखर्जी यांच्याशी भेट झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर प्रतीक्षा करत असताना मास्टर गुलाम हैदर यांनी सिगारेटच्या डब्यावर ताल धरला आणि लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्याच्या चालीवर काम केलं. याच प्रक्रियेतून ‘दिल मेरा तोड़ा, मुझे कहीं का न छोड़ा’ या गाण्याची धून आकाराला आल्याचं म्हटलं जातं.
1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजबूर’ चित्रपटातील या गाण्याला लता मंगेशकर यांचा आवाज लाभला तर संगीताची जबाबदारी मास्टर गुलाम हैदर यांनी सांभाळली. आजही जुन्या हिंदी चित्रपटगीतांची आवड असणाऱ्या प्रेक्षकांच्या स्मरणात हे गाणं आहे.