पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी; आदेश बांदेकरांच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाची उत्सुकता

पंढरीच्या भक्तीप्रवाहाची वारी थेट तुमच्या घरी येणार आहे. लाडके अभिनेते आदेश बांदेकर 'माऊली महाराष्ट्राची' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ज्यांना वारीला जाणं शक्य होत नाही, ते घरबसल्या पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेऊ शकतात.

पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी; आदेश बांदेकरांच्या माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाची उत्सुकता
Aadesh Bandekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 17, 2025 | 10:41 AM

पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी लवकरच वारी विशेष कार्यक्रम ‘माऊली महाराष्ट्राची’ भेटीला येणार आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकरांसोबत प्रेक्षकांना ही पंढरीची वारी अनुभवता येणार आहे.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना आदेश बांदेकर म्हणाले, “भेटीलागी जीवा लागलीसे आस.. अशीच काहीशी माझी भावना आहे. याआधी वारीत सहभागी झालोय पण पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी करण्याचा योग स्टार प्रवाह वाहिनीमुळे जुळून आला आहे. लक्ष्य मालिकेमुळे निर्माता होण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनीने दिली आणि आता या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीची अनुभूती घरबसल्या प्रेक्षकांना देण्याची जबाबदारीही सोपवली आहे. संतांची शिकवण, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीचं रूप, आणि संपूर्ण महाराष्ट्रात होणारा भक्तीमय उत्सव माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हाती घेतलेलं हे कार्य सुफळ संपूर्ण व्हावं हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं आहे.”

‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “विठु माऊलीची वारी स्टार प्रवाहच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवता येईल हे आमच्यासाठी पुण्याचं काम आणि अभिमानाची गोष्ट आहे. आदेश बांदेकरांसोबत अख्खा महाराष्ट्र दुमदुमून जाईल यात शंका नाही.”

‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील महान धार्मिकसंस्कृतीचा, संतपरंपरेचा, विशेषतः पंढरपूर वारीचा, भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत जाईल. प्रत्येक भागात वारीचा एक एक पैलू समोर येईल. वारकऱ्यांच्या दिंड्या, पायी चालण्यामागचं भक्तीचं तत्त्वज्ञान, महिला वारकरींची भूमिका, विध्यार्थी आणि तरुणांचा सहभाग, पालखीचा बैलरथ, भक्तीचं रिंगण, माऊलीचा अश्व, पर्यावरणपूरक वारी, सुश्रुषावारी, अन्नपूर्णा वारी, कर्तव्यवारी, सेवावारी, वारीतले पुंडलिक, वारीतले लक्ष्मी-नारायण, बंधूभेट हा संपूर्ण अनुभव माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जाईल. ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम येत्या 23 जूनपासून संध्याकाळी सहा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.