Aai Kuthe Kay Karte: ‘नाहीतर लोक मला जोड्याने मारतील’, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती

| Updated on: Apr 05, 2022 | 10:19 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची (Aniruddha) भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे किस्से, एपिसोड्सबद्दल त्यांचे विचार हे इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Aai Kuthe Kay Karte: नाहीतर लोक मला जोड्याने मारतील, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती
Milind Gawali and Medha Jambotkar
Image Credit source: Instagram
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धची (Aniruddha) भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे किस्से, एपिसोड्सबद्दल त्यांचे विचार हे इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. या मालिकेत अरुंधतीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेधा जांबोटकर (Medha Jambotkar) यांच्याविषयी त्यांनी नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. मेधा यांच्यासोबत ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन गट्टी कशी जमली, याबाबत त्यांनी लिहिलंय. पडद्यावर सोशिक आईची भूमिका साकारणाऱ्या मेधा खऱ्या आयुष्यात मात्र पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांच्यासोबत अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद यांचे खूप कमी सीन्स असतात. पण त्यातही त्यांना त्रास देण्याचे सीन्स लिहू नको अशी विनंती ते लेखिकेला करतात.

मिलिंद गवळींची पोस्ट-

‘ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन, मेधाताईंसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान, उत्साहपूर्ण, आनंददायी आणि मजामस्तीने परिपूर्ण असतो. मेधाताईंचा चेहराच इतका सोज्ज्वळ आणि प्रेमळ आहे त्यांना पाहिलं की कोणालाही आपल्याला माया लावणारी, आपली एखादी मावशी किंवा आपली प्रेमळ आत्या, किंवा जीव लावणारी आपली आई असंच वाटतं. माझ्या अतिशय मायाळू सासुबाई मेधा ताईंसारख्याच होत्या. मला अॅक्टिंगमध्ये यश मिळावं म्हणून त्या रोज माझ्यासाठी 5000 स्वामी समर्थांचा जप करायच्या. मेधाताईंना पाहिलं की मला त्यांची खूप आठवण येते. अशाच त्या पण मिश्किल होत्या. आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर मेधाताई क्वचितच येतात. त्यांचे फार कमी सीन्स त्या घरामध्ये असतात. माझे आणि त्यांचे तर खूपच कमी.. पण ज्या ज्या वेळेला मेधाताई सेटवर येतात तेव्हा संपूर्ण सेटचं वातावरणच बदलून जातं. आमचं शूटिंग चालू असेल आणि त्यांची जर एण्ट्री झाली तर थोडावेळ शूटिंग थांबतं, गोंगाट धमाल-मस्ती सुरू होते, वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि मग शूटिंगला परत सुरुवात होते,’ असं त्यांनी लिहिलं.

मेधाताईंविषयी ते पुढे लिहितात, ‘मेधाताई अरुंधतीच्या सोशिक आईंचा रोल करतात (इतकी सोशिक आई की मी नमिताला सांगतो की माझे त्यांना त्रास देण्याचे सीन लिहू नकोस, नाहीतर लोकं जोड्याने मला मारतील). पण त्या स्वतः अजिबात तशा नाहीयेत, अगदी इमोशनल सीनसुद्धा करताना त्यांचा मिश्कीलपणा चालूच असतो. हा जो आमच्या दोघांचा व्हिडिओ आम्ही काढलाय, तो त्यांच्याच डोक्यातली कल्पना आहे, आपण स्क्रीनवर कसे आहोत आणि आपण प्रत्यक्षात कसे वागतो, त्याचा आपण एक व्हिडिओ काढू असं त्या म्हणाल्या. प्रथमेश जो 2nd unit कॅमेरामॅन आहे त्यालाच त्यांनी हा व्हिडीओ काढायला सांगितला. त्या खरंच आमच्या सगळ्यांच्या स्ट्रेस बस्टर आहेत. मी जेव्हा माहीमला राहत होतो, तेव्हा मेधाताईंच्या आई मनोरमा वागळे त्यासुद्धा माहीम मध्येच राहत होत्या. शितलादेवी मंदिरात त्या कधीतरी दिसायच्या, त्यांना मी लहानपणापासून टीव्हीवर पाहिलं होतं. प्रत्येक वेळेला त्या दिसल्या मी त्यांना जाऊन नमस्कार करायचो. मला त्यांच्याबरोबर काम करायचा कधी योग आला नाही पण त्यांच्या लेकीबरोबर काम करायचं भाग्य मला लाभलं. ऋणानुबंध म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो.’

मिलिंद यांच्या या पोस्टवर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनीसुद्धा कमेंट केली आहे. ‘खूप एंजॉय केलं, खूप हसलो’, असं त्यांनी लिहिलंय. ‘तुमचं ऑन स्क्रीन काम आणि ऑफ स्क्रीन धमाल पाहून मजा आली’, असंही एका युजरने लिहिलं. ‘मालिकेतील तुमच्या भूमिकेचा खूप राग येतो, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात’, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने मिलिंद यांचं कौतुक केलं.

हेही वाचा:

Bigg Boss 15 फेम तेजस्वी प्रकाशचं मराठीत पदार्पण; अभिनय बेर्डेसोबत करणार काम

‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मालिकेतील अमृता पवारने गुपचूप उरकला साखरपुडा