
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान नुकताच ‘आप की अदालत’ या टीव्ही शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्याचसोबत त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांवरही त्याने मौन सोडलंय. आमिर या मुलाखतीत केवळ त्याच्या चित्रपटांबद्दलच नाही तर त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक बाबींबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याच्या मुलांचाही उल्लेख करण्यात आला होता. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी हिंदू होत्या. त्याने रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं, त्यानंतर किरण रावशी त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. हिंदू महिलांशी लग्न करूनही आमिरने त्याच्या मुलांची नावं मुस्लीम का ठेवली, असा सवाल त्याला या मुलाखतीत करण्यात आला होता. आमिरच्या तिन्ही मुलांची नावं जुनैद, आयरा आणि आझाद अशी आहेत.
या प्रश्नाचं उत्तर देताना आमिरने त्यामागील कारण सांगितलं. “मी सर्वांत आधी ही गोष्ट स्पष्ट करतो मी माझ्या मुलांची नावं माझ्या दोन्ही पूर्व पत्नींनी ठेवली आहेत. त्यात मी कोणताच हस्तक्षेप केला नाही. तुम्हीसुद्धा पती आहात, त्यामुळे तुम्हीसुद्धा या गोष्टीशी सहमत असाल की पतींची कोणतीही भूमिका नसते, पत्नीच मुलाचं नाव ठरवते. म्हणूनच रीनाने जुनैद आणि आयरा अशी मुलांची नावं ठेवली”, असं त्याने स्पष्ट केलं.
मुलांच्या नावांचा अर्थ स्पष्ट करताना आमिर पुढे म्हणाला, “आयरा हे नाव सरस्वती देवीवरून आलं आहे. आयरा हे इरावतीचं आणखी एक छोटं हिंदू नाव आहे. हे नाव मेनका गांधी यांच्या हिंदू नावांवरील पुस्तकातून आलं आहे. तर मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किरणने आझाद हे नाव निवडलं होतं. आमचं कुटुंब मौलाना आझाद यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मौलाना आझाद हे पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेते होते. आझाद हे मुस्लीम नाव नाही. ते क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांचंही नाव आहे.”
या मुलाखतीत आमिरने पाकिस्तान, चीन, तुर्की आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या गंभीर मुद्द्यांवरही आपलं मत मांडलं. वैयक्तिक आणि आयुष्यातील विविध पैलूंवर उघडपणे बोलतानाच आमिरने यावेळी राष्ट्रीय मुद्द्यांवरही आपले विचार मांडले.