साक्षात तुकोबांना पाहिल्याचं समाधान..; ‘अभंग तुकाराम’चा ट्रेलर पाहून गहिवरले प्रेक्षक

मराठी जनमानसासाठी तुकाराम महाराजांची 'अभंग गाथा' याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 350 वर्षांनंतरही संत तुकाराम या अजरामर रचनांमधून वास्तव्य करत आहेत. हेच तत्त्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'अभंग तुकाराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

साक्षात तुकोबांना पाहिल्याचं समाधान..; अभंग तुकारामचा ट्रेलर पाहून गहिवरले प्रेक्षक
Abhanga Tukaram Trailer
Image Credit source: Youtube
Updated on: Oct 31, 2025 | 8:59 AM

महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. संत तुकाराम महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास चकित करणारा आहे. लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे.

प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचं दर्शन घडविताना लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून उभ्या केलेल्या जीवनवादी विवेकदर्शनाची झलक या ट्रेलरमधून दिसून येत आहे. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे. त्यासोबत मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अवधूत गांधी, नुपूर दैठणकर,तेजस बर्वे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

पहा ट्रेलर-

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचं आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल दहा अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स निर्मित ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट येत्या 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगत पाठक चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यासोबत अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर यांनीही निर्मितीची धुरा सांभाळली असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.