
Lalbaugcha Raja 2025 : यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक कित्येक तास गिरगाव चौपाटीवरच रखडली होती. समुद्राला आलेल्या भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाली होती. मात्र भरतीमुळे अत्याधुनिक तराफा तरंगत राहिला आणि लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. चौपाटीवर कित्येक तास राजाची मूर्ती पाण्यातच उभी होती आणि तिथेच अनेक भाविकांनी मनसोक्त दर्शन घेतलं. या संपूर्ण घटनेवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै यानं लिहिलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.
‘लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता. इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा.. एका बाजूला व्हीआयपी लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान- हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्यावरचं आरसपानी प्रतिबिंब दिसलं. इतकंच नाही, तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमानही करण्यात आला.
पण राजा तो राजा असतो, आणि तो सर्वांचा असतो. अनंद चतुर्दशीला हे अगदी स्पष्ट झालं. जेव्हा राजा अधांतरी पाण्यात विसर्जनासाठी उभा होता, तेव्हा त्याच्या शेजारी त्याच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते नव्हते, तर कोळी बांधव तब्बल 12 तास त्याच्यासोबत खंबीरपणे उभे होते,’ असं त्याने लिहिलं.
याविषयी तो पुढे म्हणाला, ‘शेवटी रात्री 10 वाजता कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि राजा आपल्या गावी परत गेला. मात्र जे दृश्य डोळ्यांना दिसलं, राजा पाण्यात पाठ फिरवून उभा असताना – ते मनाला पिळवटून टाकणारं, अतिशय वेदनादायी होतं. आता तरी या मंडळाने समजून घ्यायला हवं की भेदभाव हा भक्तीचा भाग नसतो.’
यातून धडा काय घ्यायचा, हेसुद्धा मेहुलने सांगितलं आहे. ‘आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे, त्यामुळे कर्माची फळं लगेच परत मिळतात. लालबागच्या राजाचा विजय असो,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. राजा अर्ध्यापर्यंतच्या पाण्यात उभा होता, पण मंडळ त्यांच्या अहंकारात पूर्णपणे बुडालं होतं, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.