पुरस्कार खरेदी केल्याच्या आरोपांवर भडकला अभिषेक बच्चन; म्हणाला “25 वर्षांची कठोर मेहनत..”

अभिषेक बच्चनला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. परंतु हा पुरस्कार त्याला मिळाला नसून त्याने खरेदी केल्याचा गंभीर आरोप एका युजरने केला आहे. या आरोपांवर अभिषेकनेही सडेतोड उत्तर दिलं आहे.

पुरस्कार खरेदी केल्याच्या आरोपांवर भडकला अभिषेक बच्चन; म्हणाला 25 वर्षांची कठोर मेहनत..
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 11:12 AM

अभिनेता अभिषेक बच्चनला त्याच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ पटकावला आहे. परंतु यावरून एका युजरने सोशल मीडियावर मोठा आरोप केला. अभिषेकने हा पुरस्कार जिंकला नाही तर खरेदी केला, असा आरोप संबंधित युजरने केला आहे. या आरोपांवर अभिषेकनेही बेधडकपणे उत्तर दिलं आहे. त्याचं हे उत्तर आता सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

अभिषेक कितीही मैत्रीपूर्ण असला तरी त्याने एका पुरस्कारासाठी कसे पैसे दिले आणि वाईट जनसंपर्क वापरून स्वत:ला कशाप्रकारे उत्तम दाखवण्याचा प्रयत्न केला, याचं उदाहरण समोर आलं आहे. संपूर्ण करिअरमध्ये एकही सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरी अभिषेकला यावर्षी ‘आय वाँट टू टॉक’साठी पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट काही मोजक्या पैसे मिळालेल्या समीक्षकांशिवाय कोणीही पाहिलेला नाही. आता अचानक मला असे ट्विट्स दिसत आहे, ज्यात 2025 हे अभिषेकचं वर्ष असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व खूपच मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा बरेच चांगले कलाकार आहेत, जे खरंच पुरस्कारांसाठी पात्र आहेत. पण दुर्देवाने त्यांच्याकडे जनसंपर्काचा जाणकार किंवा पैसाही नाही”, अशी पोस्ट लिहित एका युजरने अभिषेकवर निशाणा साधला.

अभिषेक बच्चनची पोस्ट-

या आरोपांवर अभिषेकही गप्प बसला नाही. त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये संबंधित युजरला सडेतोड उत्तर देत लिहिलं, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही कोणतेही पुरस्कार खरेदी केलेले नाहीत किंवा मी कधीही भरभरून पीआर केलेलं नाही. मी जे काही केलं, ते कठोर परिश्रम करून, घाम गाळून आणि अश्रू वाहून केलं आहे. पण मी जे काही बोलतोय किंवा लिहितोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिक मेहनत करणं. जेणेकरून तुम्हाला भविष्यातील माझ्या कोणत्याही कामगिरीवर कधीही शंका उपस्थित होणार नाही. मी तुम्हाला चुकीचं सिद्ध करेन आणि तेसुद्धा अत्यंत आदरपूर्वक मार्गाने.’

अभिषेकने त्याच्या ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटात कर्करोगग्रस्त पित्याची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी समीक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं.