हे सोपं नव्हतं..; ऐश्वर्याबद्दल बोलताना अभिषेक सर्वांसमोर भावूक, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कार स्वीकारताना तो भावूक झाला. मंचावर भावना व्यक्त करताना त्याने पत्नी ऐश्वर्याचे विशेष आभार मानले.

अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये बऱ्याच उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. परंतु आजवर त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नव्हता. यावर्षी पहिल्यांदाच त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ पटकावला आहे. ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. मंचावर पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो भावूक झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“या फिल्म इंडस्ट्रीत मला 25 वर्षे पूर्ण झाली. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी काय भाषण देणार, यावर मी कित्येत वेळा सराव केला आहे. सरावाचा आकडाही माझ्या आता लक्षात नाही. माझ्यासाठी हे एक स्वप्न होतं आणि हा पुरस्कार पटकावल्यानंतर मी अत्यंत नम्र आणि भावूक झालो आहे. माझ्या कुटुंबीयांसमोर हा पुरस्कार मिळाल्यामुळे हा क्षण आणखी खास झाला आहे. मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत. गेल्या 25 वर्षांत ज्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी माझ्यासोबत काम केलं, माझ्यावर विश्वास ठेवला. हे सोपं नव्हतं”, असं अभिषेक म्हणाला.
View this post on Instagram
मंचावर भावूक झालेल्या अभिनेत्याने त्याची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांचाही उल्लेख केला. “ऐश्वर्या आणि आराध्याला हा पुरस्कार समर्पित करतो. बाहेर जाऊन काम करण्याची आणि माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला आशा आहे की हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली असेल की त्यांच्या त्यागामुळेच आज मी याठिकाणी उभा आहे. मी हा पुरस्कार दोन अत्यंत खास लोकांना समर्पित करू इच्छितो. हा चित्रपट एक वडील आणि मुलीबद्दल आहे. हा पुरस्कार मी माझ्या हिरोला, माझ्या वडिलांना आणि माझी दुसरी हिरो, माझ्या मुलीला समर्पित करतो. खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही”, अशा शब्दांत त्याने भाषणाचा समारोप केला.
‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटात अभिषेक बच्चनने एका आजारी पित्याची भूमिका साकारली आहे. शूजित सरकारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये जयंत क्रिपलानी आणि अहिल्या बामरू यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
