Imran Khan: आमिर खानच्या भाच्याची भारतातून हकालपट्टी होणार? काय आहेत OCI कार्डधारकांचे नियम?
Imran Khan: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होणं अभिनेता इमरान खानला चांगलंच महागात पडलं आहे. आता त्याला थेट भारत सोडून जाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

Imran Khan: अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इमरान खानला ताब्यात घेतलं होतं. इमरान खान हा भारतीय नागरिक नसून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (OCI) कार्ड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे परदेशी नागरिकत्व असलेल्या OCI कार्डधारकांना भारतात आंदोलन करण्याची परवानगी आहे का, त्यांच्यावर कोणते नियम लागू होतात आणि भारत सोडण्याची नोटीस का दिली जाऊ शकते, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे OCI कार्ड? भारतीय नागरिकत्वापेक्षा कसं वेगळं?
OCI म्हणजे ‘ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया’. भारतीय वंशाच्या काही परदेशी नागरिकांना भारताशी संबंधित विशेष सुविधा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, OCI कार्ड मिळालं म्हणजे भारतीय नागरिकत्व मिळालं, असा त्याचा अर्थ होत नाही. OCI कार्डधारक हा परदेशी पासपोर्ट धारण करणारा नागरिक असतो. त्याला भारतात अनेक वेळा प्रवेश करण्यासाठी आजीवन व्हिसाची सुविधा मिळते. मात्र, मतदान करणं, संसद किंवा विधानसभेचं सदस्य होणं आणि काही घटनात्मक पदं भूषवणं यांसारखे अधिकार त्याला नसतात.
OCI कार्डधारकांना आंदोलन करता येतं का?
OCI कार्डधारकांच्या भारतातील अधिकारांबाबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय आणि सार्वजनिक आंदोलनांमधील सहभाग. OCI कार्डधारकांना भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळत नाहीत. त्यांच्यावर परदेशी नागरिकांसाठी लागू असणारे नियम आणि अटीही लागू होतात. परदेशी नागरिकांना भारतात राजकीय स्वरूपाच्या आंदोलनात सहभागी होता येतं का, याबाबत संबंधित कायदे, व्हिसाच्या अटी आणि परिस्थिती तपासणं आवश्यक असतं. OCI कार्डधारकांना पत्रकारिता, संशोधन, धार्मिक प्रचार आणि काही अन्य विशिष्ट कामांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते.
इमरान खानविरोधात नेमकी कारवाई काय?
10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण जमले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत होती. या वेळी इमरान खान याच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इमरानच्या आंदोलनातील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती.
