12 वर्षांची प्रेमकहाणी, घरच्यांचा लग्नाला नकार, लग्नासाठी या अभिनेत्याने केला प्रचंड संघर्ष, आज आहे प्रसिद्ध अभिनेता

12 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर शेवटी घरच्यांना सांगितलं पण घरच्यांनी दिला लग्नाला नकार. शेवटी अभिनेत्याच्या हट्टापुढे कुटुंबाने घेतली माघार. कोण आहे हा अभिनेता?

12 वर्षांची प्रेमकहाणी, घरच्यांचा लग्नाला नकार, लग्नासाठी या अभिनेत्याने केला प्रचंड संघर्ष, आज आहे प्रसिद्ध अभिनेता
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 03, 2026 | 5:53 PM

Bollywood Actor : भारतीय चित्रपटसृष्टीत ‘कालीन भैय्या’ म्हणून ओळखले जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठी आज बॉलिवूडमधील एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय नाव आहे. कॉमेडी असो, गंभीर भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका. पंकज त्रिपाठी प्रत्येक भूमिकेत सहजतेने फिट बसतात. त्याच्या अभिनयाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते साकारत असलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत प्रेक्षक पूर्णपणे रमून जातात.

आज 49 वर्षांचे असलेले पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. या संघर्षात त्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली ती त्यांची पत्नी मृदुला त्रिपाठी. पंकज आणि मृदुला यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल अशी आहे.

पहिल्याच नजरेत प्रेम

पंकज आणि मृदुला दोघंही एकाच शाळेत शिकत होते. त्या वेळी मृदुला नववीत तर पंकज अकरावीत होते. पंकज यांच्यासाठी ते पहिल्या नजरेतील प्रेम होतं. एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं होतं की 1993 साली त्यांना मृदुला आवडली होती.

पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचं लग्न होतं. त्या लग्नसमारंभात पंकज यांनी बाल्कनीत उभी असलेली एक मुलगी पाहिली आणि त्याच क्षणी मनात ठाम विचार आला ‘या मुलीसोबतच मला माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे’. विशेष म्हणजे त्या वेळी त्यांना तिचं नावही माहिती नव्हतं ओळख तर दूरची गोष्ट.

मृदुला यांना लागली होती प्रेमाची चाहूल

मृदुलानेही एका मुलाखतीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या भावाच्या साखरपुड्याच्या दिवशी त्या तयार होण्यासाठी खोलीत जात असताना पंकज त्यांच्यासमोरून गेले. मृदुलाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवसापासून पंकज संपूर्ण लग्नसमारंभात तिच्याभोवतीच फिरत होते.

विशेष बाब म्हणजे, पंकज यांच्या बहिणीचं लग्न मृदुलाच्या सख्ख्या भावासोबत झालं होतं. त्यामुळे दोघांचा संपर्क अधिक वाढला. पंकज अनेकदा बहिणीला भेटायला या कारणाखाली मृदुलाला पाहायला जायचे. असं करत 8 वर्षं निघून गेली. दरम्यान, मृदुलासाठी घरच्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, पंकजही त्या स्थळ पाहण्याच्या प्रक्रियेत सामील होते आणि परत येऊन मृदुलाला म्हणायचे, ‘मुलगा चांगला आहे.’ त्यानंतर तब्बल चार वर्षं दोघं एकमेकांपासून दूर राहिले.

कुटुंबीयांचा विरोध आणि प्रेमाची जिद्द

प्रेमसंबंधाच्या 12व्या वर्षी दोघांनीही आपल्या कुटुंबीयांना नात्याबद्दल सांगितलं. मात्र मोठा गोंधळ उडाला. कारण एकाच कुटुंबात लग्न करणं हिंदू रीतिरिवाजांच्या विरोधात मानलं जात होतं. सुरुवातीला घरच्यांचा तीव्र विरोध होता.

मात्र पंकज आणि मृदुलाच्या ठाम भूमिकेपुढे अखेर कुटुंबीयांना माघार घ्यावी लागली. अखेर 15 जानेवारी 2004 रोजी पंकज आणि मृदुला विवाहबंधनात अडकले आणि आपल्या स्वप्नांसह मुंबईकडे वाटचाल केली.

Follow Us