पैशाच्या तंगीमुळे लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकले नाही, अभिनेत्याचा झाला मृत्यू
२ मे रोजी सकाळी मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेता विष्णु प्रसाद याने जगाचा निरोप घेतला. अभिनेता बराच काळ लिव्हरच्या आजाराने त्रस्त होता. त्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट होणार होते. पण, त्याआधीच त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

मल्याळम इंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेता विष्णु प्रसादचे निधन झाले आहे. शुक्रवारी, म्हणजेच २ मे रोजी सकाळी त्याने कोच्चीच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेता किशोर सत्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली. समोर आलेल्या माहितीनुसार विष्णु प्रसाद गेल्या कित्येक वर्षांपासून लिव्हरच्या समस्येने त्रस्त होता. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, अचानक प्रकृती खालावल्याने त्याची अवस्था आणखी बिकट झाली आणि आज सकाळी त्याने जगाचा निरोप घेतला.
विष्णु प्रसाद याच्या मृत्यूची बातमी देताना किशोर सत्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विष्णु प्रसादचा फोटो शेअर केला आहे. ‘सर्वांसाठी अत्यंत दुखद बातमी, विष्णु प्रसाद यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही काळापासून आजारावर उपचार घेत होते. संवेदना आणि प्रार्थना आहे. त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती मिळावी’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
Video: शोच्या नावाखाली मुलींना कपडे काढायला लावता; एजाज खानच्या शोवर नेटकरी संतापले
पैशांची व्यवस्था होत होती
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याचे लिव्हर ट्रान्सप्लांट होणार होते, पण पैशांची व्यवस्था करणे कुटुंबीयांसाठी कठीण झाले होते. अभिनेत्याची मुलगीच त्याला लिव्हर दान करणार होती, पण या उपचारासाठी ३० लाख रुपये लागणार होते. पैसे जमा करण्यात अडचण येत असल्याने असोसिएशन ऑफ टेलिव्हिजन मीडिया आर्टिस्ट्स (एटीएमए) ने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती, पण १ मे रोजी अभिनेत्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांचे निधन झाले.
टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा
विष्णु प्रसाद यांना अभिरामी आणि अनन्या अशा दोन मुली आहेत. अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली. यामध्ये कासी (२००१), कैयेथुम दूरथ (२००२), रनवे (२००४), मम्बाझक्कलम (२००४), बेन जॉनसन (२००५), लोकनाथन आयएएस (२००५), पाठका (२००६) आणि लायन (२००६) यांचा समावेश आहे. चित्रपटांसोबतच विष्णु प्रसाद हे टेलिव्हिजनच्या दुनियेतही खूप प्रसिद्ध चेहरा होते.
