Bhagyashree: दोघांना लोळवेल इतपत माझ्यात ताकद..; गणपती आरतीच्या वादात भाग्यश्रीचे वडील स्पष्टच बोलले

Bhagyashree: सांगलीतल्या श्री गणपती पंचायतन संस्थान या ठिकाणी गणपतीच्या उत्सव मूर्तीची आरती अभिनेत्री भाग्यश्री यांनी केली होती. यावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफाळून आला आहे.

Bhagyashree: दोघांना लोळवेल इतपत माझ्यात ताकद..; गणपती आरतीच्या वादात भाग्यश्रीचे वडील स्पष्टच बोलले
अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचे वडील
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 17, 2026 | 10:16 AM

Bhagyashree: सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानात उत्तराधिकारी पदावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिचे वडील श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी दत्तक पुत्र राजकुमार आदित्य राजे यांना उत्तराधिकारी म्हणून नेमलं आहे. मात्र अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी त्यांना डावलून गणपती मंदिरात आरतीचा मान घेतला. यामुळे पटवर्धन कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आदित्यराजे हेच उत्तराधिकारी असल्याचं सांगत भाग्यश्री यांना आरती करण्याचा अधिकार नसल्याचं विजयसिंह राजे पटवर्धन यांनी म्हटलं आहे. यावर आता त्यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. मी आजारी असल्याचं बोलण्यात आलं, मात्र मी दोघांना लोळवेल इतपत माझ्या अंगात ताकद आहे, असं ते म्हणाले.

याविषयी ते पुढे म्हणाले, “भाग्यश्रीने गणपती मंदिरात केलेलं कृत्य चुकीचंच होतं. भाग्यश्रीला इतर दोन मुलीप्रमाणेच आम्ही मानसन्मान देतो. मात्र एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा येऊन पूजा करणं हा प्रकार चुकीचा आहे. यापुढं संस्थानाचा युवराज म्हणून आदित्यराजेच काम पाहतील हा माझा निर्णय आहे.” अशी स्पष्ट प्रतिक्रिया देऊन त्यांनी उत्तराधिकारीच्या वादाला पूर्णविराम दिला.

नेमका वाद काय?

गणेशोत्सवाच्या सुरुवातीला भाग्यश्री पटवर्धन यांनी श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्सवमूर्तीची आरती केली. मात्र, सध्या संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून आदित्यराजे पटवर्धन यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याने भाग्यश्रीच्या आरतीवरून मंदिर व्यवस्थापनाशी वाद झाल्याचं वृत्त आहे. आरतीच्या मानावरून भाग्यश्री आणि मंदिराचे व्यवस्थापक तसेच पुजाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलं. यानंतर भाग्यश्रीने माध्यमांशी बोलताना आपल्या कुटुंबाची जुनी परंपरा जपण्यासाठी आपण मंदिरात गेल्याचं सांगितलं होतं. वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे गणपती उत्सवाची परंपरा पुढे नेण्यासाठी कुटुंबातील मुलींपैकी कोणीतरी उपस्थित असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

विजयसिंहराजेंनी आदित्यराजे पटवर्धन यांनाच संस्थानचा उत्तराधिकारी म्हणून आपला निर्णय असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. आदित्यराजेंना उत्तराधिकारी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाग्यश्रीने हा निर्णय मान्य करून आदित्यराजेंना विनाकारण त्रास देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us