
Amitabh Bachchan – Jaya Bachchan : गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे.आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डीपफेक यांचा वापर दिवसागणिक वाढला असून सेलिब्रिटींना याचा वाईट अनुभव येत आहे. आता महानायक अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमीत अरोरा त्यांच्या याचिकेवर सुनावणी करतील.
या याचिकेमुळे जया बच्चन यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, ज्यामुळे कोणीही त्यांचे नाव, प्रतिमा किंवा आवाज व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यापासून रोखले जाईल. पण कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाऊन जर कोणी असं केल्यास ती व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते.
सांगायचं झालं तर, आपल्या नावाचा, फोटोचा वाईट वापर होऊ नये यासाठी जया बच्चन यांच्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन, कुमार सानू यांसारख्या सेलिब्रिटींनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.
ऐश्वर्या राय बच्चन हिने सप्टेंबर 2025 मध्ये एक याचिका दाखल करून तिच्या नावाचं, आवाजाचं आणि प्रतिमेचं कमर्शियल फायदे करण्यापासून संरक्षण मागितलं होतं. ही याचिका बनावट वेबसाइट्सच्या विरोधात होती ज्या त्यांचे अधिकृत प्लॅटफॉर्म असल्याचं खोटं भासवत होत्या आणि परवानगीशिवाय अभिनेत्रीचे फोटो वापरूव प्रॉडक्ट विकत होत्या.
अभिषेक बच्चनने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती, ज्याचा उद्देश AI-जेनरेटेड अश्लील सामग्री थांबवणे देखील होता. याचिकेत अभिनेत्याने चुकीचं URL काढून टाकण्याची आणि बेकायदेशीर सामग्री असलेल्या वेबसाइट ब्लॉक करण्याची मागणीही केली होती.
2023 मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर रोखला गेला.