Madhuri Dixit : ‘वर्स्ट शो एव्हर..’ माधुरी दीक्षितवर भडकले चाहते, नक्की काय घडलं ?

नेहा कक्कर हिच्यानंतर आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिला लोकांच्या रोषाचा सामनाा करावा लागत आहे. ती बरीच ट्रोल होत आहे, असं नेमकं घडलं तरी काय ?

Madhuri Dixit : वर्स्ट शो एव्हर.. माधुरी दीक्षितवर भडकले चाहते, नक्की काय घडलं ?
माधुरी दीक्षितवर भडकले चाहते
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 04, 2025 | 12:12 PM

बॉलिवूडमध्ये अनेक सौंदर्यवती अभिनेत्री आहे, पण निखळ , मोहून टाकणारं हास्य, डोळ्यातली चमक आणि वेड लावणारं सौंदर्य म्हणजे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) .. तसं पहायला गेलं तर अनेक दशकं मोठा पडदा गाजवणारी माधुरी कधीच फारशा विवादात सापडली नाही.  पण सध्या मात्र माधुरी दीक्षितला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे, तिच्यावर टीकाही होत आहे. त्याचं कारणंही समोर आलं आहे. माधुरी दीक्षित सध्या अमेरिकेतील चाहत्यांच्या भेटीसाठी दौऱ्यावर आहे. मात्र त्यामुळेच तिला टीकेचाही सामना करावा लागला.

कॅनडातील टोरंटो येथील एका कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की माधुरी तिथे तब्बल तीन तास उशिरा पोहोचली. यामुळे अनेक लोकं संतापले असून तिचं मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झालं.
या वर्षाच्या सुरुवातीला, गायिका नेहा कक्कर हीदेखील मेलबर्नमधील एका संगीत कार्यक्रमात उशिरा पोहोचल्याने वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर तिला ट्रोलही करण्यात आले होते. अखेर नेहाने सोशल मीडियावर आपलं मौन सोडत सत्य सांगितले आणि आयोजकांना जबाबदार धरत माफी मागितली.

3 तास लेट पोहोचल्याने माधुरीवर भडकले लोक

त्यानंतर आता माधुरीबाबतीतही असंच काहीसं घडल्याचा दावा केला जात आहे. तिच्या कॅनडा टूरमधील एका शोची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मजकूर लिहीला, ‘ मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो, माधुरी दीक्षितच्या टूरला जाऊ नका… तुमचे पैसे वाचवा.’ अनेक प्रेक्षकांनी असा दावा केला की या शोसाठी तिकीटावर 7:30 ची वेळ देण्यात आली होती, मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले होते, मात्र या शोसाठी माधुरी मात्र 10 वाजता स्टेजवर आली. त्यामुयळे लोकं खूप नाराज होते. विलंबामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला “अव्यवस्थितपणा,” “वेळेचा अपव्यय” आणि “आतापर्यंतचा सर्वात वाईट कार्यक्रम” असं म्हणत टीका केली. अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त केला.

“मला माहित नाही की ही आयोजकांची चूक होती की माधुरीची, पण इतक्या उशिरा सुरुवात करणे म्हणजे प्रेक्षकांचा वेळ वाया घालवणे आहे.” असं एकाने लिहीलं. तर काहींनी कायदेशीर कारवाईचा सल्ला दिला. “प्रत्येकाने ग्राहक संरक्षण ओंटारियोला याची तक्रार करावी” असंही एका यूजरने यावर लिहीलं. लोकांना हा प्रकार बिल्कुल आवडला नाही आणि त्यांनी भरपूर टीका केली.

काहींचा माधुरीला पाठिंबा

अशा टीकेच्या काही कमेंट्स येऊनही काही लोकांनी मात्र माधुरी दीक्षितला सपोर्ट केला. “तिने नेहमीप्रमाणेच सुंदर परफॉर्म केलं.! (झालेला उशीर) ही निर्मिती किंवा व्यवस्थापन समन्वयाची समस्या असल्याचं दिसतं.” असं एका युजरने लिहीलं. ” माधुरी दीक्षित अद्भुत आहे. खरे चाहते तिचं मूल्य जाणतात. जर ऑर्गनायजेशन नीट नसेल तर ती माधुरीची चूक नाही. तिने तिथे असणं हेच खास आहे” असं आणखी एकाने लिहीलं.