
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. चित्रपटप्रेमींपासून, बॉलिवूड आणि साऊथच्या स्टार्सनाही हा चित्रपट खूप आवडतोय. थिएटर ते सोशल मीडिया.. सर्वत्र फक्त याच चित्रपटाची चर्चा आहे. परंतु असेही काहीजण आहेत, ज्यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. कन्नड अभिनेत्री रम्याने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने तिचं मत मांडलं आहे.
रम्याने चित्रपटाच्या कंटेंट आणि त्याच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने लिहिलंय, ‘आताच मी ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाहिला. एखाद्या चांगल्या गोष्टीला तुमच्या सहनशक्तीची परीक्षा कशी बनवता येते, याचा हा एक उत्तम नमुना आहे. हे एखाद्या अत्यंत कंटाळवाण्या विषयावरील न संपणारी प्रकरणं असलेलं पुस्तक वाचण्यासारखंच आहे. अक्षरश: एका क्षणी तुमचं मन हार मानतं आणि पडद्यावर उलगडणाऱ्या अत्याचारांवर हसू येतं. जर तुम्हाला हा चित्रपट खरंच पाहायचा असेल तर स्वत:वर उपकार करा आणि तो पाहू नका. थिएटरमध्ये पैसा आणि वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा तुम्ही हा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पहा, जिथे तुम्ही एका क्लिकवर तो बंद करू शकता.’
‘दिग्दर्शन, संवाद, एडिटिंग, गाणी, बॅकग्राऊंड स्कोर, अभिनय.. सर्वच निकृष्ट दर्जाचं आहे. 19 मार्चची डेडलाइन जवळ आली आहे, असं त्यांना कोणीच सांगितलं नव्हतं असं वाटतंय. कदाचित त्यापेक्षाही वाईट गोष्ट अशी असेल की त्यांना कदाचित माहीत असेल पण तरीही ते म्हणाले असतील, होय परफेक्ट आहे, पाठवून द्या. धुरंधरचा पहिला भाग पाहताना प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, शिट्या वाजवत होते, त्यांच्याक एक ऊर्जा होती. परंतु हा चित्रपट पाहताना जणू थिएटरमध्ये सामूहिक निराशा जाणवत होती. लोक म्हणतायत की रणवीरने चित्रपटात खूप दमदार काम केलंय. मला तर फक्त त्याचे केसच दिसत होते’, अशा शब्दांत तिने टीका केली आहे.
Just watched Dhurandhar 2 and wow! what a masterclass in how to turn something promising into an endurance test.
It’s like reading a textbook of the most boring subject with never-ending chapters and at some point, your brain just gives up and starts laughing out of sheer despair…— Ramya/Divya Spandana (@divyaspandana) March 20, 2026
चित्रपटात दाखवलेल्या हिंसेबाबत तिने पुढे लिहिलंय, ‘हा चित्रपट नाही, तर एक व्हिज्युअल हँडबुक (जे असायला नको होतं) आहे, ज्याद्वारे हे पहायला मिळतं की तुमच्या आसपास असलेल्या कुठल्याही वस्तूने हिंसा केली जाऊ शकते. सिरींज, स्पॅनर, चाकू, स्पाइक्ड बॉल्स, रीपर्स, चेन, गन, बॉम्ब, शटर.. जी नावं घ्याल त्यांचे त्यांनी हत्यार बनवले आहेत. दिग्दर्शक कदाचित स्वत:शीच स्पर्धा करत होते की पुढचा सीन मागच्या सीनपेक्षा अधिक हिंसक किंवा कॉमिकल कसा बनवू? एका टप्प्यानंतर हे सर्व हास्यास्पद वाटू लागतं. एकंदर हा चित्रपट म्हणजे मोठी निराशा आहे. जर तुम्हाला पहिला भाग आवडला असेल तर तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचाराल की धुरंधर 2 का बनवला? रणवीर यापेक्षा चांगलं काहीतरी करू शकतो आणि आदित्य धरने प्रचारकी विषयांना सोडून पुढे जावं.’
फक्त रम्याच नाही ‘सिंघम’ फेम अभिनेता प्रकाश राज यांनीसुद्धा या चित्रपटावर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर, महेश बाबू आणि विजय देवरकोंडा यांसारख्या धुरंधर 2 चं कौतुक करणाऱ्यांवरही त्याने ताशेरे ओढले आहेत.