नाना पाटेकरांच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं? गायक आदर्श शिंदेने काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. पाटेकरांच्या निधनाने कलाकारमंडळी शोकसागरात बुडाली आहेत. नाना पाटेकरांच्या निधनाच्या वृत्तावर आदर्श आणि उत्कर्ष शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला हादरा बसला आहे. अनेकांना त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. अनेक दिग्गज अभिनेत्यांना नाना पाटेकरांच्या निधनाच्या वृत्ताने अश्रू अनावर होत आहेत. अनेकांना काय बोलू, हे सुचेना झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी शारिरीकरित्या मजबूत असलेल्या नाना पाटेकरांचं कार्डियक अरेस्टने निधन झाल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी गायक आदर्श शिंदेने नाना पाटकेरांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकं काय घडलं, याबाबत आदर्श शिंदेने सांगितले. त्याने भेटीत नाना पाटेकरांचा साधेपणा भावल्याचे सांगितले.
नाना पाटेकर हे फक्त पडद्यावर भूमिका साकारत नव्हते, तर भूमिका जगत होते, अशा भावना कलाकार मंडळी देखील बोलून दाखवत आहेत. नानांच्या निधनाच्या वृत्तावर आदर्श शिंदेला विश्वासच बसेना झाला आहे. आदर्शने म्हटलं की, ‘ ही बातमी खरंच खरी आहे का? विश्वास बसत नाहीए. नानांना नुकतंच भेटलो होतो… तेव्हाची भेट, त्यांचं बोलणं, त्यांचा साधेपणा आणि तो आपलेपणा अजूनही डोळ्यांसमोर आहे. आणि आज त्यांच्या जाण्याची बातमी मन सुन्न करून गेली’.
उत्कर्ष शिंदेची पोस्ट जशीच्या तशी
आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्षनेही पोस्ट करत नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. उत्कर्षने पोस्ट करत म्हटलं की, ‘नाना… तुम्हाला निरोप देताना खरंच शब्द सुचत नाहीयेत. तुम्ही आमच्यासाठी फक्त एक महान कलाकार नव्हतात…तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि आशीर्वाद देणारे एक आपले माणूस होता. आजोबा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या भक्तिगीतांवर तुमचं असलेलं प्रेम आम्ही नेहमीच अनुभवलं. बाबांच्या ‘नवीन पोपट’ या गाण्याच्या काळापासून ते आदर्शच्या प्रवासापर्यंत, आमच्या संगीताच्या प्रत्येक पिढीकडे तुम्ही ज्या आपुलकीने पाहिलंत, ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुमच्याशी बोलताना कधीही असं वाटलं नाही की, आपण एका एवढ्या मोठ्या कलाकाराशी बोलतोय’.
‘तुमच्या साधेपणामुळे आणि आपुलकीमुळे नेहमीच घरच्याच माणसाशी बोलतोय, असंच वाटायचं. तुमचे ते शब्द… तुमचं मार्गदर्शन… तुमचे आशीर्वाद…आज सगळं आठवतंय आणि मन भरून येतंय. नाना, तुमचं जाणं ही केवळ अभिनयविश्वाची नाही, तर आमच्यासाठीही एक वैयक्तिक पोकळी आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद आम्ही आयुष्यभर जपून ठेवू. तुम्ही शरीराने नसाल, पण तुमच्या आठवणी, तुमचा आवाज, तुमचं काम आणि तुमचं प्रेम कायम आमच्यासोबत राहील. नाना… तुम्ही खूप आठवाल, असं म्हणत उत्कर्षने नानांना श्रद्धांजली वाहिली.
