
गायक, संगीतकार अदनान सामीने 2016 मध्ये भारताचं नागरिकत्व मिळवलं होतं. ‘तेरा चेहरा’, ‘लिफ्ट करा दे’, ‘भर दो झोली मेरी’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी तो ओळखला जातो. नुकतीच त्याने ‘आप की अदालत’ या मुलाखत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तो त्याच्या करिअर आणि इतर मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. अदनानने या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक प्रसंगसुद्धा सांगितला. पाकिस्तानी नागरिकत्व सोडल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आलं नव्हतं. कारण पाकिस्तानात जाण्यासाठी त्याचा व्हिसा नाकारण्यात आला होता.
‘आप की अदालत’मध्ये पत्रकार रजत शर्मा यांनी अदनानला विचारलं की भारताचं नागरिकत्व स्वीकारल्यानंतर तो कधी पाकिस्तानला गेला का? त्यावर उत्तर देताना त्याने 2024 मधील हा प्रसंग सांगितला. गेल्या वर्षी अदनानची आई बेगम नॉरीन यांचं निधन झालं होतं. परंतु आईच्या अंत्यविधीला अदनान जाऊ शकला नव्हता. आईला कोणताच आजार किंवा आरोग्याच्या समस्याही नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या अचानक सोडून जाण्याने त्याला खूप मोठा धक्का बसला होता. आईच्या निधनाचं वृत्त कळताच अदनानने व्हिसासाठी अर्ज केला आणि भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला आवश्यक त्या परवानग्या दिल्या.
याविषयी तो म्हणाला, “मी इथल्या सरकारला विचारलं की मला जायचं आहे, तर तुमचा काही आक्षेप तर नाही ना? ते म्हणाले, तुमच्या आईचं निधन झालं आहे, तुम्ही नक्कीच तिथे जायला हवं. भारतीय अधिकाऱ्यांकडून कोणतीच समस्या नव्हती. मी व्हिसासाठी अर्ज केला आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या आईचं निधन झालं आहे. तरीसुद्धा त्यांनी माझा व्हिसा नाकारला होता. अखेर मी आईला शेवटचं पाहण्यासाठीही जाऊ शकलो नव्हतो. मी व्हिडीओ कॉलद्वारे आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताना पाहिलं.”
या मुलाखतीत अदनानने हेसुद्धा स्पष्ट केलं की तो आर्थिक फायद्यासाठी भारतात स्थलांतरित झाला नाही. “किंबहुना एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो आणि बरीच संपत्ती सोडून मी भारतात आलो”, असं तो म्हणाला. गायक अदनान सामीला डिसेंबर 2015 मध्ये भारताचं नागरिकत्व मिळालं होतं. अदनानचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून त्याचे आई-वडील पाकिस्तानी आहेत. अदनानचं शिक्षणसुद्धा परदेशातच पूर्ण झालं होतं.