
Bollywood Actress : भारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती असणारे मुकेश अंबानी यांच्या घरासोबत त्यांच्या संपत्तीची देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु असते. अशातच आता सोशल मीडियावर एक जुनी पण भन्नाट गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आहे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे घर आणि त्यासंदर्भातील एक अनोखा दावा. एका व्हायरल झालेल्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि चर्चा रंगली असून या फोटोमध्ये बिग बी यांच्या घरातील बाथरूममध्ये असलेले गोल्डन टॉयलेट स्पष्टपणे दिसत आहे. फोटो पाहताच सोशल मीडियावरील युजर्स आश्चर्यचकित झाले असून ते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर ही चर्चा सुरू झाली आहे ती अभिनेता विजय वर्माच्या एका थ्रोबॅक पोस्टमुळे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘2026 इज द न्यू 2016’ या ट्रेंडचा भाग बनत विजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2016 मधील आठवणींना उजाळा देणाऱ्या काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विजयच्या करिअरमधील महत्त्वाचे क्षण दिसत असले तरी त्यातील एक खास सेल्फी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
बिग बींच्या बाथरूममधील सेल्फी ठरला चर्चेचा विषय
विजय वर्माने शेअर केलेला हा सेल्फी थेट अमिताभ बच्चन यांच्या घरातील बाथरूममध्ये काढलेला आहे. या फोटोमध्ये जे सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे तिथे दिसणारे सोन्याच्या रंगाचे टॉयलेट. हा सेल्फी समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘वा! गोल्डन टॉयलेट!’ दुसऱ्याने मजेशीर अंदाजात म्हटले, ‘पहिल्यांदाच विजयने एवढं लक्झरी टॉयलेट पाहिलं आणि लगेच सेल्फी घेतली.’ तर आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘या फोटोमध्ये खरा स्टार तर गोल्डन टॉयलेटच आहे.’
2016 हे वर्ष विजय वर्मासाठी खास
या फोटोसोबत विजय वर्माने एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. त्यात तो म्हणतो, 2016 हे वर्ष माझ्यासाठी खास ठरले. मला बिग बी आणि शूजित दा यांच्यासोबत ‘पिंक’सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना भेटलो. अमिताभ बच्चन यांच्या घरातील गोल्डन टॉयलेटसोबत सेल्फी घेतली. संजय मल्होत्रा आणि फातिमा सना शेख भेटले. माझ्या हिरो इरफान खान यांची भेट झाली’ असं त्याने म्हटलं आहे.