
अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोघांच्या वयात 31 वर्षांचं अंतर आहे. याबद्दल सलमानने ट्रेलर लाँचदरम्यान प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर अनेकांनी ‘भाईजान’ला ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा सलमान कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. यामागचं कारण त्याने स्पष्ट केलंय. त्याचसोबत भविष्यात अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरसारख्या कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बुधवारच्या पत्रकार परिषदेत सलमान म्हणाला, “मला भविष्यात जरी अनन्या पांडे किंवा जान्हवी कपूरसोबत काम करायची इच्छा असेल तरी आता लोकांना माझ्यासाठी ते कठीण बनवून ठेवलंय. कारण पुन्हा ते वयातील अंतराचा मुद्दा उपस्थित करतात. मी त्यांच्यासोबत या विचाराने काम करततो की त्यामुळे त्यांना एक चांगली संधी मिळेल. त्यांच्या करिअरमध्ये त्याचा फायदा होईल. परंतु लोक काय विचार करतात हे मला माहीत नाही. मी तर त्यांच्या भल्याचाच विचार करतोय. पण ठीक आहे, एके दिवशी मी त्या दोघींसोबत काम नक्की करेन.” सलमानपेक्षा अनन्या वयाने 33 वर्षांनी तर जान्हवी 31 वर्षांनी लहान आहे.
सलमान 59 वर्षांचा असून ‘सिकंदर’मध्ये त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी रश्मिका 28 वर्षांची आहे. या दोघांच्या वयात 31 वर्षांचं अंतर आहे. त्यावरून सवाल केला असता सलमान म्हणाला होता, “जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, तर मग तुम्हाला का समस्या आहे? जेव्हा तिचं लग्न होईल, तिला मुलगी होईल तेव्हा मी तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना?” यावरून प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने सलमानवर टीकासुद्धा केली होती. ‘हिरोईन और हिरोईन के ‘बाप’ को कोई प्रॉब्लेम नहीं है.. तो जब इनकी शादी हो जाएगी आणि..’परवानगी’ अशी कचऱ्यासारखी प्रतिक्रिया देणाऱ्या, पुरुषत्वाची आणि पितृसत्ताकाची विषारी मानसिकता ठेवणाऱ्या भाईला हे कळत नाही का, की भारत बदलला आहे?’ असं ट्विट सोनाने केलं होतं.