
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तर सतत होतच असतात. हे दोघं वेगवेगळे राहत आहेत, त्यांच्यात खटके उडाले आहेत.. अशा अनेक चर्चा ऐकायला मिळतात. परंतु ऐश्वर्या आणि अभिषेक कधीच त्या चर्चांना महत्त्व देत नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिषेक याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे. आमचं कुटुंब आनंदी आणि निरोगी आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे,” असं तो म्हणाला होता. त्यानंतर आता दोघांनी एकत्र परदेशात एकत्र नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. लेक आराध्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक न्यूयॉर्कला गेले होते. तिथेच त्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि एकत्र नवीन वर्षाचं जल्लोषाने स्वागत केलं.
न्यूयॉर्क शहरात नवीन वर्ष साजरं करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ चाहत्यांकडून सर्वाधिक शेअर करण्यात आला. यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक सजवलेल्या ख्रिसमस ट्रीसमोर एका चाहत्यासोबत पोझ देताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तिथल्या थंड हवामानानुसार त्यांचा पोशाख होता. फेन पेजवर व्हायरल झालेल्या आणखी एका क्लिपमध्ये ऐश्वर्या तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळतंय. कॅमेरासमोर ती हसत म्हणते, “तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, देवाचा आशीर्वाद असो आणि माझं प्रेम तुम्हा सर्वांसोबत कायम राहील.” नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहसुद्धा न्यूयॉर्कला गेले होते. एनबीए गेममध्ये ते सहभागी झाले होते.
गेल्या वर्षभरात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. परंतु आधी अभिषेकची मुलाखत आणि त्यानंतर या दोघांना न्यूयॉर्कमध्ये एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांनाही खात्री पटली आहे की, त्यांच्यात सर्वकाही चांगलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत पोहोचला होता. मात्र फक्त ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या वेगळ्या आल्या होत्या. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. याआधी 2014 मध्येही या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या.