300 वर्षांनंतर ती परत येतेय..; ‘काजळमाया’ने वाढवली उत्सुकता, कोण आहे ती?

गूढ आणि उत्कंठावर्धक विषय असलेली नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'काजळमाया' असं या मालिकेचं नाव असून यामध्ये अक्षय केळकर मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच पोस्ट करण्यात आला आहे.

300 वर्षांनंतर ती परत येतेय..; ‘काजळमाया’ने वाढवली उत्सुकता, कोण आहे ती?
Akshay Kelkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 17, 2025 | 11:55 AM

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन गूढ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे काजळमाया. चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट आहे. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा एका अद्भूत गोष्टीला सुरुवात होते. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया. सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर यामध्ये आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे.

काजळमाया मालिकेतल्या आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला, “मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहसोबतची ही माझी पहिली मालिका आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा आहे. अत्यंत साधा, सरळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा. त्याचा चांगुलपणा ही त्याची ओळख आहे. आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे. त्याचं व्यक्तिमत्व सामान्य असलं तरी मराठी विषयातलं त्याचं ज्ञान आणि विशेषकरुन कविता वाचनातली त्याची हातोटी कमाल आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अश्या पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे.” अक्षय केळकर हा मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनचं विजेतेपद जिंकलं होतं.

स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “गूढ, उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात रहातात. प्रेक्षकांनी अशा विषयांना आधी पण पसंती दिली आहे. काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने काजळमाया खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय.”