Dhurandhar : अक्षय खन्नाच नाही, ‘धुरंधर 2’मध्ये हे 4 अभिनेते दिसणार नाहीत

'धुरंदर' या चित्रपटाचा दुसरा भाग मार्च 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पहिल्या भागाने थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु 'धुरंदर पार्ट 2'मध्ये पहिल्या भागातील पाच कलाकार दिसणार नाहीत.

Dhurandhar : अक्षय खन्नाच नाही, धुरंधर 2मध्ये हे 4 अभिनेते दिसणार नाहीत
अक्षय खन्ना, रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 25, 2025 | 8:50 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची क्रेझ अजूनही पाहायला मिळतेय. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु कमाईच्या बाबतीत रणवीर सिंहच्या या चित्रपटाला आत्तापर्यंत कोणीच मात देऊ शकलं नाही. ‘धुरंधर’ने जगभरात आत्तापर्यंत तब्बल 870 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर फक्त भारतात या चित्रपटाची 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा खरा हिरो तर अक्षय खन्ना ठरला. रहमान डकैतची भूमिका साकारून त्याने संपूर्ण लाईमलाईटच स्वतःकडे खेचून घेतली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु या सीक्वेलमध्ये पहिल्या भागातील पाच कलाकार दिसणार नाहीत. हे पाच कलाकार कोणकोणते आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल यांनी जबरदस्त काम केलंच आहे. पण त्यांच्यासोबतच सारा अर्जुन, सौम्य टंडन यांच्याही अभिनयाचं कौतुक होत आहे. या मुख्य कलाकारांशिवाय सहाय्यक कलाकारांनीही उत्तम काम केलंय. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. परंतु पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत चित्रपटात झळकणारे पाच कलाकार आता ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागात दिसणार नाहीत. कारण पहिल्या भागातच या सर्वांची भूमिका संपुष्टात आली आहे.

‘धुरंधर 2’मध्ये दिसणार नाहीत हे पाच कलाकार

1. नवीन कौशिक (डोंगा): नवीन कौशिक या चित्रपटात रहमान डकैतचा राईट हँड म्हणून दिसला, जो कायम रहमानच्या सुरक्षेसाठी सज्ज असतो आणि त्याला सर्वजण डोंगा या नावाने ओळखतात. खासकरून रणवीर सिंहच्या भूमिकेसोबत त्याची चांगली मैत्री दाखवण्यात आली आहे. क्लायमॅक्स सीनमध्येही डोंगाने जबरदस्त कामगिरी केली. जेव्हा संजय दत्तच्या एन्ट्रीनंतर रहमान जंगलात पळून जातो, तेव्हा त्या परिस्थितीत एकटा डोंगाच पोलिसांच्या संपूर्ण टीमला रोखून ठेवतो. दोन्ही हातांनी गोळ्या झाडात त्याने साहसदृश्येही कमालीने साकारली आहेत. ही भूमिका चित्रपटाच्या पहिल्या भागातच संपुष्टात आली आहे.

2. रुहुल्लाह गाजी (स्याही): हा रहमान डकैतच्या टीममधला एक सदस्य असतो. या भूमिकेला चित्रपटात थोड्याशा मजेशीर अंदाजात दाखवलं गेलं. परंतु चित्रपटाच्या अखेरीस हाच अभिनेता रहमान डकैतला गाडीतून बाहेर काढतो. त्यानंतर जंगलात तो हमजाचा पाठलाग करतो. परंतु नंतर स्याहीसोबत हमजाची टक्कर पाहायला मिळते. अखेर स्याहीला हमजा मारून टाकतो आणि त्याची भूमिका इथेच संपते.

3. हितुल पुजारा (नईम बलोच): या चित्रपटात हिुल रहमान डकैतच्या मोठा मुलाच्या भूमिकेत आहे. परंतु फ्रेममध्ये त्याची एन्ट्री होताच एक्झिटसुद्धा होते. ज्याचे प्राण वाचवून रणवीर सिंह म्हणजेच हमजा रहमानच्या गँगमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. परंतु नईमचा लग्नात मृत्यू होतो आणि त्यानंतर चित्रपटात रहमान डकैत म्हणजेच अक्षय खन्नाची एन्ट्री होते.

4. आसिफ अली हैदर खान (बाबू डकैत): हा रहमान डकैतचा बाप असतो, ज्याचा मृत्यूसुद्धा रहमानच्याच हातून होतो, ते सुद्धा दगडाने ठेचून. हे चित्रपटाच्या सुरुवातीमध्ये दाखवण्यात आलं आहे की एक गॅंग बाबू डकैतची आणि एक गँग रहमान डकैची असते. रहमानच्या मुलाच्या मृत्यूमागे बाबूचा हात असतो. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी रहमान त्याच्याच वडिलांच्या जीवाचा शत्रू बनतो. अखेर भर बाजारात दगडाने ठेचून तो बाबू डकैतला मारून टाकतो.

5. अक्षय खन्ना (रहमान डकैत): पहिल्या भागातील अक्षय खन्नाच्या अंदाजाने, स्टाईलने आणि डान्सने अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत फक्त आणि फक्त अक्षय खन्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. या चित्रपटात त्याने इतकी दमदार कामगिरी केली की त्याच्यासमोर रणवीर सिंहसुद्धा फिका पडला. प्रेक्षक समीक्षकांकडून अक्षय खन्नावर भरपूर प्रेमाचा वर्षाव झाला. परंतु धुरंधरच्या दुसऱ्या भागात तो दिसणार नाही.