
अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सध्या त्याच्या करिअरच्या एकदम गोल्डन काळात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या वर्षाच्या सुरूवातीला आलेला “छावा” असो की वर्षाखेरीस आलेला “धुरंधर” (Dhurandhar) .. दोन्ही चित्रपटातील अक्षयच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. धुरंधरचा बॉक्स ऑफीसवर कल्ला सुरू आहेच, पण त्यातील रेहमान डकैतच्या कामाचं, त्या भूमिकेचं तर कौतुक करताना लोक थकत नाहीयेत. अक्षयच्या अभिनयाचे लोक दिवाने झाले असून, जो तो त्याचं काम, त्याचा स्वॅग, त्याचा अभिनय, डान्सची स्टाइस याचीच तारीफ करत आहेत. सगळं जग अक्षय खन्ना याला नावाजत आहे. असं असताना दुसरीकडे अक्षयचा सख्खा भाऊ, राहुल खन्ना (Rahul Khanna) याने मात्र त्याच्या भावाचं उत्तम काम असलेला ‘धुरंधर’ चित्रपट अजून पाहिलाच नाहीये. एका इंटरव्ह्यूमध्ये खुद्द राहुल खन्ना यानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.
राहुलने अद्याप का नाही पाहिला ‘धुरंधर’?
आदित्य धरचे दिग्दर्शन असलेला, रणवीर सिंग स्टारर “धुरंधर” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने “जवान” आणि “पठाण” सारख्या चित्रपटांना मागे टाकलं असून तो बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. तसेच अक्षय खन्नाच्या रेहमान डकैतच्या भूमिकेचेही खूप कौतुक होत आहे. ही भूमिका, हे काम त्याच्या सर्वोत्तम अभिनयापैकी एक असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. दरम्यान, अक्षय खन्नाचा सख्खा भाऊ राहुल खन्ना याने हा पिक्चर अजून पाहिला नाहीये. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने या गोष्टीचा खुलासा केला असून त्याचं कारणंही स्पष्ट केलं आहे. ‘मी अजून तो (धुरंधर) चित्रपट पाहिलेला नाही. तो (अक्षय खन्ना) मला हा चित्रपट कधी दाखवतोय याची मी वाट पाहतोय ‘ असं राहुल याने सांगितलंय .
या मुलाखतीत राहुल खन्ना हा अक्षयचा स्क्रीन प्रेझेन्स आणि स्टाईलबद्दलही बोलला. “तो जे काही घालतो ते त्याच्यावर छान दिसतं, त्यामुळे मला खात्री आहे की तो चित्रपटातही छान दिसला असेल” असंही राहूलने नमूद केलं.
अक्षय आणि राहुलचं बाँडिंग कसं ?
राहुल आणि अक्षय हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आणि गीतांजली खन्ना यांची मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाची अनेकदा चर्चा झाली आहे, विशेषतः विनोद खन्ना यांनी चित्रपट आणि कौटुंबिक जीवनापासून दूर राहून आध्यात्मिक गुरू ओशो यांचे अनुसरण करण्याचा आणि नंतर अनेक वर्षांनी अभिनयात परतण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तर बरंच काही बोललं गेलं आहे. राहुलशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल आणि पालक (आई-वडील) गेल्यानंतर असलेल्या अतूट बंधनाबद्दल अक्षय एका जुन्या मुलाखतीत बोलला होता. “त्या अर्थाने, ते बदललेले नाही.पण एखाद्या व्यक्तीसाठी सर्वात जवळचे कुटुंब म्हणजे त्याचे पालक आणि भावंडं असतात. आणि जेव्हा ते (कुटुंब) कमी होऊ लागतं, तेव्हा जे लोक उरतात,त्यांना तुम्ही आणखी जास्त महत्व देता, ते जास्त महत्वाचे वाटू लागतात” असं अक्षय तेव्हा म्हणाला होता. विनोद खन्ना यांनी कविता दफ्तरी यांच्यांशी दुसरं लग्न केलं, त्यांना साक्षी आणि श्रद्धा खन्ना अशी दोन मुलं आहेत.
अक्षयसाठी 2025 ठरलं शानदार
2025 हे वर्ष अक्षयसाठी एक शानदार वर्ष ठरलं. धुरंधरच्या आधी, फेब्रुवारी महिन्यात आलेल्या ‘छावा’ चित्रपटात त्याने औरंगजेब साकारत नकारात्मक भूमिका केली होती. ‘छावा’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता, मात्र डिसेंबरमध्ये रिलीज ‘धुरंधर’ने त्यालाही मागे टाकलं आहे. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर, एकाच वर्षात बॉक्स ऑफिसवर 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा अक्षय खन्ना हा शाहरुख खाननंतर दुसरा बॉलिवूड अभिनेता बनला आहे.