MUM vs PUN : सर्फराजचं वादळी अर्धशतक व्यर्थ, 7 फलंदाज 25 धावा करण्यात अपयशी, मुंबईचा 1 रनने पराभव
VHT Mumbai vs Punjab Match Result : अभिषेक शर्मा याच्या नेतृत्वात पंजाबने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबईवर 1 धावेने मात केली.

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 8 जानेवारीला मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या स्पर्धेत सी ग्रुपमध्ये मुंबई विरुद्ध पंजाब आमनेसामने होते. मुंबईने पंजाबला 216 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे मुंबईला 217 धावांचं माफक आव्हान मिळालं. सर्फराज खान, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यासारखे तगडे आणि कॅप्ड फलंदाज असल्याने मुंबई हा सामना जिंकून साखळी फेरीचा शेवट विजयाने करेल, असं निश्चित समजलं जात होतं. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी खरंच अप्रतिम बॉलिंग करत धमाका केला. पंजाबने मुंबईला 215 धावांवर ऑलआऊट करत अवघ्या 1 धावाने सनसनाटी आणि थरारक असा विजय मिळवला. पंजाबने या विजयासह सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.
सामन्यात काय झालं?
मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबला 45.1 ओव्हरमध्ये 216 धावांवर गुंडाळलं. पंजाबसाठी रमनदीप सिंह याने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर अनमोलप्रीत सिंह याने 57 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त मुंबईच्या गोलंदाजांसमोर एकालाही 20 धावाही करता आल्या नाहीत. मुंबईसाठी मुशीर खान याने सर्वाधिक 3 विकेटस घेतल्या ओंकार तारमाले, शिवम दुबे आणि शशांक अत्तार्डे या त्रिुकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर साईराज पाटील याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
मुंबईची चाबूक सुरुवात
मुंबईने विजयी धावांचा पाठलाग करताना फलंदाजांनी चाबूक सुरुवात केली. भारताने 25 षटकांत 200 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मुंबईचा विजय निश्चित वाटत होता. मात्र इथून खरा गेम फिरला. पंजाबने जोरदार मुसंडी मारत तगड्या मुंबईला बॅकफुटवर ढकललं. पंजाबने मुंबईला 215 धावांवर गुंडाळलं आणि अवघ्या 1 धावेने मैदान मारलं.
चांगल्या सुरुवातीनंतर घसरगुंडी
अंगकृष रघुवंशी (23) आणि मुशीर खान (21) या सलामी जोडीने 57 धावांची भागीदारी केली. सर्फराज खाने या स्फोटक अर्धशतक झळकावलं. सर्फराजने 20 चेंडूत 62 धावांची विस्फोटक खेळी साकारली.
7 फलंदाज 25 धावा करण्यात अपयशी
कर्णधार श्रेयस अय्यर याने 45 धावा करत मुंबईला विजयाजवळ आणून ठेवलं. मुंबईने 4 विकेट्स गमावून 191 धावा केल्या होत्या. त्यामुळे इथून मुंबई सामना गमावेल, असा कुणी विचारही केला नव्हता. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी खरंच कमाल केली. पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईला 24 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले आणि सामना जिंकला.
सूर्यकुमार-शिवम अपयशी
सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक तामोरे या तिघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र हे तिघेही झटपट बाद झाले. तिघांनी अनुक्रमे 15,12 आणि 15 अशा धावा केल्या. साईराज पाटील याने 2 धावा केल्या. तर शशांक अत्तार्डे आणि ओंकार तारमाळे या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर शम्स मुलानी नाबाद राहिला.
पंजाबसाठी गुरनूर ब्रार याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. मयंक मार्कंडे याने मुंबईच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरप्रीत ब्रार आणि हरनूर सिंग या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
