
महाराष्ट्र आणि देशातील इतर भागात गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात जरी गणेश चतुर्थी साजरी केली जात असली तर महाराष्ट्रात या उत्सवाचं विशेष महत्त्व आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाजत-गाजत गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते आणि मनोभावे त्यांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीनिमित्त विविध मंडळांमध्ये कार्यक्रमही आयोजित केले जातात. अशाच एका कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये निया शर्मा, जास्मिन भसीन, अली गोणी, समर्थ जुरेल, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, कश्मीरा शाह यांचा समावेश होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जास्मिन भसीन तिच्या बॉयफ्रेंडला ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करायला सांगते. परंतु अली गोणी काहीच न म्हणता फक्त हसतो. या क्लिपमध्ये जास्मिनसोबत अभिनेत्री निया शर्मासुद्धा दिसतेय. निया आणि जास्मिन बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत जयघोष करू लागतात. तेव्हाच बाजूला उभ्या असलेल्या बॉयफ्रेंड अली गोणीकडे वळत जास्मिन त्याचे गाल पकडते. जणू ती इशाऱ्याने अलीलाही जयघोष म्हणायला सांगते, असं वाटतं. परंतु अली फक्त हसतो. पुढे काहीच म्हणत नाही. यावरून त्याने ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणण्यास नकार दिल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इतकं अस्वस्थ वाटत असेल तर यायचं कशाला? जास्मिनने तिच्या रिलेशनशिपबद्दल पुन्हा विचार करावा, असा सल्ला एकाने दिला. तर ‘जर त्याला बोलायचं नव्हतं, तर मग तो आलाच कशाला’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. यात काहींनी अलीचीही बाजू घेतली. जर अली जास्मिनवर त्याच्या धर्माच्या बाबतीत कोणती बंधने आणत नाही, तर ती का असं वागतेय, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. जास्मिन पंजाबी आणि अली मुस्लीम असल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
यादरम्यान अली गोणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणेश चतुर्थीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रपरिवारासोबतचे त्याचे हे फोटो आहेत. ‘कुटुंब’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले होते. परंतु त्यातही गणपती बाप्पाची मूर्ती न दिल्याने नेटकऱ्यांनी अलीला प्रश्न विचारले.