Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी काम केलेल्या मराठी सिनेमाचं नाव माहीत आहे काय? बिग बींचे मराठीशी असे कनेक्शन

बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणाऱ्या बिग बी यांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यावधी चाहते आहेत.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी काम केलेल्या मराठी सिनेमाचं नाव माहीत आहे काय? बिग बींचे मराठीशी असे कनेक्शन
अमिताभ बच्चन
| Updated on: Oct 11, 2025 | 9:47 AM

बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणाऱ्या बिग बी यांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं तर काहींनी प्रेक्षकांना खळखळूव हसवलं. वयाची 82 वर्ष उलटून गेली तरीही बिग बी आज नेहमीच्याच उत्साहाने , सातत्याने, अविरत पण काम करत असतात. याच बिग बी यांनी एक मराठी चित्रटातही काम केलं होत हे फार कमी लोकांना माहीत असेल. तुम्हाला त्या चित्रपटाचं नाव माहीत आहे का ?

अमिताभ बच्चनचा मराठीशी संबंध आल्याच्या या काही आठवणी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितल्या. चला जाणून घेऊया अमिताभ यांच्या मराठी चित्रपटाविषयी…

अमिताभ यांचा मराठी चित्रपट कोणता, काय म्हणाले दिलीप ठाकूर ?

अमिताभ बच्चनचा मराठी सांस्कृतिक कार्यक्रम व मराठी चित्रपटसृष्टी यांच्या नातेसंबंधाच्या गोष्टी अनेक. त्यातील काही सांगायलाच हव्यात. अमिताभ बच्चनचा मराठी चित्रपटसृष्टीशी सर्वप्रथम संबंध आला , मराठी चित्रपट निर्माते सतिश कुलकर्णी यांनी आपल्या तुलसी प्रॉडक्शन्सच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक ‘च्या ज्युबिली हिट सोहळ्यास खास अमिताभ बच्चनलाच आमंत्रित करण्यात यश मिळवलं. खुद्द सतिश कुलकर्णी यांनी अमिताभचे तेव्हाचे सेक्रेटरी शीतल जैन यांच्याशी व्यावसायिक संबंध साधून अमिताभचा होकार मिळवला असे त्यांचेच म्हणणे आहे. अमिताभची ही मराठीतील पहिली उपस्थिती. आदबशीर अशी शाल लपेटून अमिताभ आला होता. मला आठवतंय त्याच दिवशी त्याची भूमिका असलेला मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम ‘ प्रदर्शित झाला. अमिताभच्या येण्याने ‘एकापेक्षा एक ‘च्या यशाची उंची आणखीन वाढली. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शानदार सोहळ्यात प्रसन्न वातावरण होते. व्यासपीठावरील सचिन पिळगावकर यांचा उत्साह अतिशय बोलका होता.

अमिताभ बच्चननी मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याचाही सुयोग आला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट या चित्रपटाची निर्मिती त्यांचे मेकअप मन दीपक सावंत यांनी केली आहे. या चित्रपटाचे नाव ” आक्का” ( 1994 ) आणि दिग्दर्शन होते श्रीधर जोशी यांचे! या चित्रपटात अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्यावर तू जगती अधिपती नमन तुला पहिले श्री गणपती असे श्री गणपतीचे आरती‌ गीत होते. याचे चित्रीकरण मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील देवळात करण्यात आले.

अमिताभ बच्चनचा मराठीशी संबंध आलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टीत राजकमल कला मंदिरच्या चित्रपती व्ही. शांताराम फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शतक महोत्सवी मराठी चित्रपट 3 मे 1993 ते 3 मे 2013 या संदर्भ सूचीचे २०१५ साली अमिताभ बच्चनच्या शुभ हस्ते अतिशय थाटात प्रकाशन झाले. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात अमिताभ बच्चननी अतिशय उत्तम मराठी भाषेत केलेले भाषण मराठीतील सर्व वृत्त वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. अमिताभ बच्चनच्या या मराठीतील भाषणाची चित्रपटसृष्टी, अमिताभचे चाहते आणि प्रसार माध्यमातून भरपूर चर्चा झाली.

अमिताभ बच्चन यांच्या शुभ हस्ते शानदार सोहळ्यात मी सिंधुताई सकपाळ, ढोलकी अशा मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन करण्यात आले. ढोलकी चित्रपटाच्या सोहळ्यात सिध्दार्थ जाधव अमिताभच्या भेटीने कमालीचा रोमांचित झाला होता हेही आठवतंय.

(लेखक दिलीप ठाकूर हे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत)