Amitabh Bachchan |बिग बींना कमी वयात मिळाला मोठा धडा; म्हणून दारू-सिगारेटला लावत नाहीत हात

अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की दारू आणि सिगारेट सोडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यांनी मद्यपान आणि धुम्रपान यासाठी सोडलं कारण हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता.

Amitabh Bachchan |बिग बींना कमी वयात मिळाला मोठा धडा; म्हणून दारू-सिगारेटला लावत नाहीत हात
Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2023 | 11:15 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या दीड महिन्यापासून शूटिंगपासून दूर आहेत. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली होती. तेव्हापासून ते घरीच आराम करत आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या सतत संपर्कात आहेत. सोमवारी 10 एप्रिल रोजी त्यांनी मद्यपान आणि धुम्रपानविषयी एक किस्सा चाहत्यांना सांगितला. कॉलेजमध्ये असताना ते काही मित्रांसोबत विज्ञानाच्या प्रयोगशाळेत दारू पिण्यासाठी जमले होते. मात्र या घटनेनंतर जे घडलं, त्यामुळे बिग बींनी दारू आणि सिगारेट कायमची सोडली. त्या घटनेतून बिग बींना आयुष्यभरासाठी मोठा धडा मिळाला.

अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की दारू आणि सिगारेट सोडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यांनी मद्यपान आणि धुम्रपान यासाठी सोडलं कारण हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. बिग बींनी अनेक वर्षांपासून दारू किंवा सिगारेटला हातदेखील लावलेला नाही.

कॉलेजमधील ती घटना

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, ‘मला माझे स्कूल-कॉलेजचे दिवस आठवतात. जिथे नेहमीच शब्द किंवा अभिव्यक्तीचा संदर्भ विज्ञानाच्या प्रयोगशाळेतील प्रॅक्टिकल्सने दिला जायचा. घटकांचं मिश्रण करणं, भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत गॅझेट्रीसह खेळणं.. कॉलेजचा रोजचा तोच दिनक्रम. एके दिवशी पदवीचा शेवटचा पेपर संपला. तेव्हा काही मित्र सायन्स लॅबमध्ये दारू पिऊन सेलिब्रेशन करत होते. ते फक्त प्रयोगाकरिता दारू पित होते. पण अचानक एक मित्र आजारी पडला. त्या घटनेनं मला दारू पिण्याच्या दुष्परिणामांबाबत खूप लवकर धडा शिकवला होता.’

बिग बींचा वैयक्तिक निर्णय

बिग बींनी या ब्लॉगमध्ये पुढे लिहिलं, ‘शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मी अशा अनेक घटना पाहिल्या आहेत, जेव्हा दारूच्या या अतिरेकाने कहर केला होता. जेव्हा मी सिटी ऑफ जॉय अर्थात कोलकातामध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मीसुद्धा सोशल ड्रिंक करायला सुरुवात केली. मित्रांसोबत ते सामान्य झालं होतं. मी दारू प्यायचो हे नाकारत नाही. परंतु ते सोडणं किंवा पिणं हा वैयक्तिक निर्णय होता. सिगारेटच्या बाबतीतही असंच घडलं. ते सोडण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे ताबडतोब निर्णय घेणं आणि नंतर ते सोडणं. हा सर्वांत सोपा मार्ग आहे. सिगारेट ओठांवरच चिरडून टाका आणि कायमचं सोडून द्या.’