
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी नुकताच लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त मुलगी श्वेता बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ आणि जया यांचे हे फोटो तुम्ही आजवर कदाचित पाहिले नसतील.

अमिताभ आणि जया यांनी 1973 मध्ये लग्न केलं. ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

'जंजीर' या चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते. जयादेखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावं लागलं.

लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जयादेखील आहेत, हे जेव्हा हरिवंशराय बच्चन यांना समजलं तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचं असेल तर दोघांनाही आधी लग्न करावं लागेल. याच कारणास्तव दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी छोटेखानी सोहळ्यात लग्न केलं.

बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.